ऑनलाईन रिपोर्टर
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं आज पहाटेच्या सुमारास अपघाती निधन झालं. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. विनायक मेटे यांच्या कुटुंबियांची कामोठेच्या एमजीएम रुग्णालयात भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “ही अत्यंत दुर्दैवी घटना असून राज्य सरकार विनायक मेटे यांच्या कुटुंबासोबत आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
“मला ते ३-४ दिवसांपूर्वीच भेटले”
“या वृत्तावर माझाही विश्वास बसला नाही. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सातत्याने ते संघर्ष करत होते. त्यांनी अनेक आंदोलनं केली. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचेही ते अध्यक्ष होते. मला ते ३-४ दिवसांपूर्वीदेखील भेटले होते. त्यांचा एकच ध्यास होता की आता तुम्ही दोघं आहात. त्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळेल. आज आम्ही एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. पण दुर्दैवाने त्यांचं दु:खद निधन झालं आहे. सरकार त्यांच्या परिवारासोबत आहे. विनायक मेटेंच्या पत्नीवरदेखील दु:खाचा डोंगर कोसळला आहे”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.