
तरुणाच्या हत्येने बीड शहरात पुन्हा एकदा खळबळ
जोपर्यंत आरोपी अटक करत नाहीत तोपर्यंत शवविच्छेदन करू दिले जाणार नाही
दुपारपर्यंत तिढा सुटला नव्हता

बीड (रिपोर्टर): किरकोळ कारणावरून दोन तरुणात वाद निर्माण झाल्याने एका तरुणास चाकुने भोसकून त्याचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात घडली. या प्रकरणी एक आरोपी पोलिसांनी अटक केला असून या प्रकरणात आणखी आरोपी असून त्यांनाही अटक करण्यात यावी या मागणीसाठी सकाळी मयताच्या नातेवाईकांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत शवविच्छेदन करू दिले जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. गेल्या काही दिवसांपूर्वीच पालवण चौक परिसरातही मित्रानेच मित्राचा निर्घृणपणे खून केला होता. त्या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच रात्री पुन्हा एकदा खुनाची घटना घडली.

पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा यश देवेंद्र ढाका (वय 21 वर्षे, रा. बलभीमनगर बीड) व सुरज आप्पासाहेब काटे (रा. अंबिका चौक, बीड) या दोन तरुणांमध्ये काल वाद निर्माण झाला होता. यांच्यातला वाद रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान पुन्हा उफाळून आला. या वादातून सुरज काटे याने यश ढाका याचा चाकुने भोसकून खून केला. ही घटना माने कॉम्प्लेक्स परिसरात घडली. या घटनेने बीड शहरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी आरोपी सुरज काटे याला शिवाजीनगर पोलिसांनी रात्रीच अटक केली. या प्रकरणात आणखी आरोपी असून त्या आरोपींनाही अटक करण्यात यावी या मागणीसाठी मयताच्या नातेवाईकांनी आज सकाळी शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले . जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत शवविच्छेदन करू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला होता. दुपारी दीड वाजेपर्यंत या प्रकरणाचा तिढा सुटलेला नव्हता. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत आहे. काही दिवसांपूर्वीच मित्रानेच मित्राचा निर्घृरपणे खून केला होता. या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच रात्री पुन्हा एक खून झाला आहे.








