
गेवराई (रिपोर्टर) :धनगर समाजातील एसटी आरक्षणाची अमलबजावणी तातडीने करण्यात यावी, या मागणीसाठी धनगर समाजाने आवाज बुलंद केला आहे. समाजाचे उपोपमुख्य दीपक भाऊ कारडे यांना अन्याय होत असल्याचा ठपका ठेवत येत्या 26 सप्टेंबर रोजी शुक्रवारी गेवराई तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे तहसीलदार यांना कळविण्यात आले आहे.
धनगर समाजाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धनगर समाज एसटी आरक्षणाच्या अमलबजावणीसाठी वर्षानुवर्षे लढा देत आहे. मात्र शासन वेळकाढूपणा करून समाजाची फसवणूक करत आहे. सुप्रीम कोर्टासह विविध समित्यांनी धनगर समाज हा आदिवासी असल्याचे प्रमाणित करून देखील अजून आरक्षणाचा लाभ मिळत नाही. त्यामुळे समाजामध्ये संतापाचे वातावरण आहे. गेवराई तालुक्यातील संपूर्ण धनगर समाज बांधवांनी आज एकत्र येऊन या आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. समाजातील युवक-युवतींना नोकरी व शिक्षण क्षेत्रात न्याय मिळावा, यासाठी आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी व्हावी, हीच त्यांची प्रमुख मागणी आहे.
या मागण्यांकडे शासनाने तातडीने सकारात्मक पवित्रा घ्यावा, अन्यथा आणखी तीव्र आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही धनगर समाजाने दिला आहे.









