
माणसांनी बनवलेल्या मूर्तीच्या मंदिरात सुवर्णदान करण्यापेक्षा ईश्वराने बनवलेल्या माणसांसाठी दान करा
मसनवाटा पाण्यात, अंत्यविधी दुसर्या गावात

बीड (ठिकठिकाणच्या रिपोर्टरकडून): रात्री बाराच्या ठोक्यावर ढगांचा गडगडाट, विजांच्या कडकडाटासह पुन्हा एकदा मुसळधार पावसाने तांडव करायला सुरुवात केलीय. जिल्ह्यातल्या सात तालुक्यात 18 महसूल मंडळात सकाळपर्यंत 65 मि.मी.पासून 120 मि.मी.पर्यंत पावसाची नोंद झाली. या अतिवृष्टीने नुकसान काय झाले, हे विचारण्यापेक्षा शिल्लक काय राहिले ही विचारण्याची वेळ इथल्या प्रत्येक पावसाने पिचलेल्या माणसावर आली. आजच्या पावसाने पुन्हा एकदा मांजरा, गोदावरी, सिंदफणा, बिंदुसरा यासह छोट्या-मोठ्या नद्या, ओढ्यांना पूर आले. अनेक गावांचे संपर्क पूर्णत: तुटले. विध्वंसकारी पावसाने शेती पिके उद्ध्वस्त तर केलीच आता थेट शेतातली माती खंदून घेऊन जात आहे.

रस्त्यावरचे पुल उद्ध्वस्त होत आहेत. मध्यम, लघू प्रकल्पांना अनेक ठिकाणी धोका निर्माण झालाय. बीड जिल्ह्यातले जे मोठे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना पुराचा धोका कायम आहे. अनेक गावांनी रात्र जागून काढली आहे. अत्यंत विदारक, भयभीत परिस्थिती निर्माण झाली असून बीड शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. अनेकांच्या घरात पाणी गेले आहे. जी परिस्थिती बीडची आहे तीच स्थिती जिल्ह्यातल्या अनेक गावांची आहे. अशा वेळी एकमेकांना मदत करणे हे अत्यंत गरजेचे असून माणसाने बनवलेल्या मूर्तीच्या मंदिरात सुवर्णदान करण्यापेक्षा ईश्वराने बनवलेल्या माणसांसाठी आता दान करण्याची योग्य संधी ईश्वर-अल्लाहने तुम्हा-आम्हाला दिली आहे. भयावह परिस्थितीचे उदाहरण द्यायचे झाले तर पिंपळादेवी या गावात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला, तिथे सर्वत्र पाणी साचलेले, मसनवाटा पाण्याखाली, अंत्यसंस्काराला जागा नाही, म्हणून शेजारच्या गावात त्या वृद्ध महिलेच्या पार्थीवदेहावर अंत्यसंस्कार करावे लागले. यातून बीड जिल्हा किती भयावह परिस्थितीतून जात आहे याची कल्पना येते.








