
वृद्धेच्या पार्थीवावर शेजारच्या गावात अंत्यसंस्कार
बीड – बीड तालुक्यातील पिंपळादेवी गावात आज सकाळी एका 70 वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. त्या वृद्धेच्या पार्थीवदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गावात कुठेही जागा शिल्लक नाही, सर्वत्र पाणी, मसनवाटा पाण्याखाली असल्यामुळे गावकर्यांना त्या वृद्धेच्या पार्थीवदेहावर शेजारच्या गावात म्हणजे लिंबारुई देवी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. या घटनेतून जिल्ह्याच्या गंभीर परिस्थितीचे स्वरुप समोर येते.
पावसाने हाहाकार उडवून दिला, रात्री बारा वाजल्यापासून पाऊस सुरू झाला. त्यामुळे नद्या-नाल्या एक झाले असून सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली. बीड तालुक्यातील पिंपळादेवी या गावात सर्वत्र पाणी असल्याने गावापुढे वृद्धेवर अंत्यविधी कुठे करायचा? हा प्रश्न पडला. आज येथील जनाबाई सारंग घुबडे (वय वर्षे 70) यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थीवदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पिंपळादेवी येतील गावकर्यांना शेजारच्या गावामध्ये जावे लागले. गावातून अंत्ययात्रा भरपावसात काढली. पार्थीवदेह टेम्पोमध्ये घेऊन तो लिंबारुईदेवी या ठिकाणच्या स्मशानभूमीत आणण्यात आला. तिते जनाबाई घुबडे यांच्या पार्थीवदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यातून अतिवृष्टीने निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीचे स्वरुप समोर येते.








