
पोलिसांचा मासिक नव्हे दैनिक 20 हजारांचा हप्ता
गेवराई तालुक्यातील 15 ते 20 गावाच्या गोदापात्रातून सर्रास वाळू उपसा
20 हजार द्या 24 तासात काय वाळू उपसा करायचा तो करा, पोलिसांकडून हायवा चालकांसाठी सेल
35 पेक्षा अधिक केनयांद्वारे होतो वाळू उपसा, एका केनीचा गेवराई पोलिसांना 50 हजारांचा हप्ता
एसपी साहेब, कलेक्टर साहेब गणिमी कावा करा, तुमची पोलीस आणि महसूलचा विभाग अंधारात नागवा दिसेल
बीड/गेवराई (रिपोर्टर): यंदा ओसंडून वाहिलेल्या गोदामाईच्या पात्रात गौण खजिना मोठ्या प्रमाणावर आल्याने वाळूमाफिये बिनदीख्खतपणे महसूल आणि पोलीसांच्या संगणमताने गेवराई तालुक्यात गोदामाईचे लचके तोडण्यास तत्पर झाल्याचे दिसून येत असून गेल्या आठवडाभरापासून सर्रासपणे अवैध वाळू उपसा केला जात आहे. ज्यावेळेस महसूल विभागाला मासिक हप्ता ठरवला गेला आहे तर पोलीसांनी मात्र एका हायवेकडून दिवसाला 20 हजार रुपये दैनिक हप्ता सुरू केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. हायवा मालकाला 20 हजार द्या, 24 तासात किती ट्रिप मारायच्या तेवढ्या मारा असे स्पष्ट पोलीसांकडून सांगण्यात येते. दैनिक हप्ता घेण्यामध्ये गेवराई पोलीस आघाडीवर असल्याचे सांगितले जाते. मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा होत असतांना शासन, प्रशासन याकडे दुर्लक्ष करते. यातूनच वाळूमाफियांच्या लुटारूंच्या टोळीत पोलीस आणि महसूलचे अधिकारी कर्मचारी हमाम में सब नंगे हे दाखवून देतात.

बीड जिल्ह्यात अधिकृतपणे अद्याप एकही वाळूघाट चालू नाही. त्यामुळे अवैधपणे वाळू उपसा गेल्या आठ दिवसांच्या कालखंडात मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. गेवराई तालुक्यातल्या गेवराई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावरगाव, खामगाव, नागझरी, म्हाळसपिंपळगाव, हिंगणगाव, संगमजळगाव तर चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राक्षसभूवन, पांचाळेश्वर, सुरळेगाव, गुळज आणि इकडे तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगावाडी, राजापूर, काठोडा, तपेनिमगाव यासह अन्य गावाच्या गोदावरी नदीपात्रातून सर्रासपणे वाळू उपसा सुरू झाला आहे. या 15 ते 20 गावांमधून रोज शेकडो हायवा, ट्रॅक्टर, एलपी ट्रक वाळू तस्करी करत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. सायंकाळी 5 च्या नंतर एखाद्या इमानदार अधिकार्याने वरिल गावांचा दौरा केला अथवा त्या गावांच्या रस्त्यावर उभा राहिला तर कितीतरी वाळूमाफियांच्या गाड्या त्या रस्त्याने गोदामाईचे लचके तोडून निघताना दिसून येतील. रिपोर्टरच्या माहितीनुसार या परिसरामध्ये तब्बल 35 पेक्षा अधिक केण्याद्वारे वाळू उपसा केला जात आहे. यावेळेस पोलीसांनी आपल्या हप्त्याची पद्धत पुर्णत: बदलून टाकली आहे. मासिक हप्ता घेण्याऐवजी पोलीसांकडून दैनिक हप्ता घेण्यास सुरूवात केली आहे.
एका हायवे मालकाला 24 तासांसाठी 20 हजार रुपये रोज हप्ता म्हणून घेतला जातो. विशेष म्हणजे ज्या 35 पेक्षा अधिक केण्या आहेत त्या केण्याचालकांकडून पोलीस ठाण्याला मासिक 50 हजार रुपयांचा हप्ता सुरू करण्यात आला आहे. गेवराई तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा पोलीसांच्या आशिर्वादाने सर्रासपणे केला जातो. या गंभीर बाबीकडे जिल्ह्यातल्या वरिष्ठ अधिकार्यांनी पुर्णत: दुर्लक्ष केल्याचे जानवते, त्यामुळे राज्य शासनाचा कोट्यावधीचा महसूल एकीकडे बुडत असतांना पर्यावरणाचा र्हासही मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येत आहे.
गेवराई पोलीसांनी हप्त्याची पद्धत बदलली
एसपी साहेब, कलेक्टर साहेब लक्षपूर्वक वाचा आणि म्हणातील मनात हिशोब करा, गेवराई तालुक्यातील पोलीस स्टेशनची कमाई काय? हे आमचे वाक्य नाही, गेवराई तालुक्यातल्या लोकांचे घोषवाक्य आहे. गोदावरी पात्रातून वाळू उपसा करण्यासाठी आता हायवे चालकांना मासिक हप्ता नव्हे तर दैनिक हप्ता गेवराई पोलीसांनी सुरू केलाय. एका हायवेला रोज 20 हजार 24 तासांसाठी घेतले जातात. 20 हजार द्या व 24 तासात काय वाळू उपसा करायचाय ती करा असे थेट सांगितले जाते.
15 ते 20 गावच्या गोदापात्रातून वाळू उपश्यासाठी 35 केण्या
झोपेचे सोंग घेतलेल्या महसूल विभागाने आता झोपेतून जागं व्हावं, आम्ही गावाचे नाव सांगितले आहे, त्या गावच्या गोदाकाठावर जा आणि तेथून पहा 35 पेक्षा अधिक केण्यांमधून सर्रासपणे वाळू उपसा केला जातोय. या केण्या चालकांकडून गेवराई पोलीसांना एका केणीमागे 50 हजार रुपये मासिक हप्ता सुरू आहे. हे खोटं असेल तर या गावच्या कुठल्याही व्यक्तीला फोन करा, नाही तर गाईड म्हणून सोबत घ्या, वरिष्ठ अधिकार्यांनो तो माणूस तुम्हाला त्या केण्यांपर्यंत घेवून जाईल. हे आम्ही खात्रीने सांगू.
टेम्पोंचेही हप्ते
वाळूमाफिये आणि लाचखोर पोलीस व महसूल विभागाने सर्रासपणे हप्ते घेण्यास सुरूवात केली आहे. बीडच्या लक्ष्मी चौक ते शहरात वाळू आणण्यासाठी छोट्या टेम्पोंनाही आता हप्ते आहेत. सुत्राच्या माहितीनुसार ट्रॉफिक, एलसीबी, ग्रामीण व अन्य पोलीस ठाण्यांना प्रत्येकी 7 हजार रुपयांचा हप्ता या टेम्पोंकडून दिला जातो.
वाळूमाफियांपेक्षा तस्करीला पोलीसच उत्सूक
आणखी एक मजेदार माहिती हाती आली आहे. ज्यांच्याकडे हायवे आहेत अशांकडे थेट पोलीस जात आहेत. तुझा हायवा चालू कर, हप्ता बांध असं म्हणत हायवे मालकांना पोलीसच गळ घालत असल्याचे बोलले जाते.
एसपी साहेब, कलेक्टर साहेब तुम्ही जिल्हा कव्हर केला, गेवराई पोलीस तो नागवा करतायत
जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत काँवत आणि जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी संवेदनशील बीडला अत्यंत संवेदनशीलतेने हाताळत त्याची निट घडी बसविण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला. त्यांना त्यात यशही येत आहे मात्र माफीयांशी हातमिळवणी करत काही पोलीस अधिकारी आणि महसूल मधील वरिष्ठ अधिकारी या दोघांच्या प्रयत्नांना हरताळ फासतांना दिसून येतात. गेवराई तालुक्यात सर्रासपणे वाळू उपसा केवळ आणि केवळ पोलीस अधिकार्यांमुळेच होतो. त्यात महसूल अधिकार्यांचाही तेवढाच सहभाग. दोघांनीही या भागात गणीमिकावा केला तर हे लाचखोर पोलीस आणि महसूल अधिकारी, कर्मचारी उघडे पडतील हे तेवढेच खरे.
एलपीच्या गाड्यांकडे बनावट पावत्या
14 ते 16 टायरची एलपी गाडीतूनही वाळूची सर्रासपणे तस्करी या भागातून होतांना दिसून येत आहे. गुजरात मार्फत बनावट पावत्या या एलपी गाडीमध्ये पहायला मिळतात. या सर्व गाड्या गोदामाईच्या पात्रातूनच वाळू भरतात यांचा हप्ता ही ठरविण्यात आल्याचे सांगण्यात येते.
पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही वाळू तस्करी
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिंदफनेतून मोठ्या प्रमाणावर वाळूची तस्करी केली जाते. इथेही मंडल अधिकारी, तलाठी आणि पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस मोठ्या प्रमाणावर हप्ता घेवून वाळू तस्करांना सिंदफनाचे लचके तोडायला परवानगी देत असल्याचे दिसून येते.
—-








