
बीड, (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असतानाच, आज गुरुवारी सकाळी आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चौसाळा ते पारगाव टोल नाका परिसरात सकाळी आठच्या सुमारास तिघा चोरट्यांनी दिवसाढवळ्या ट्रॅव्हल्स गाडीवरून तब्बल 12 बॅगा लंपास केल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, ही मिनी ट्रॅव्हल्स गाडी चौसाळा फाट्याकडून पारगावकडे जात असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी गाडीवरील बॅगा एक-एक करून रस्त्याच्या कडेने फेकायला सुरुवात केली.
काही क्षणातच त्यांनी त्या बॅगा उचलून दुचाकीवर बसत पळ काढला.चोरी गेलेल्या बॅगांपैकी एका बॅगमध्ये तब्बल 30 हजार रुपयांची रोकड असल्याचे चालकाने सांगितले. या घटनेनंतर परिसरात काही वेळासाठी एकच खळबळ उडाली असून, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
दरम्यान, पाली (ता. बीड) येथे मध्यरात्री कॅनरा बँक फोडण्याची घटना घडून नुकतीच चौकशी सुरू असतानाच, दिवसाढवळ्या घडलेल्या या चोरीमुळे पोलिसांच्या गस्त व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजचा तपास सुरू असून, या घटनेने महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.








