
कितीही धमक्या आल्या तरी मी घाबरणार नाही
एसआयटीच्या चौकशीसाठी गावकर्याचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन
बीड, (रिपोर्टर)ः- आमची लेक गेली, या लेकीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करणार आहे. कितीही धमक्या आल्या तरी अशा धमक्यांना मी घाबरणार नसून 3 तारखेला फलटण येथे आंदोलन करण्यात येणार असल्याचे शिवसेनेच्या उपनेत्या सुष्मा अंधारे यांनी म्हंटले आहे. अंधारे यांनी आज मुंडे कुटूंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रूपालीताई ठोंबरे, शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांच्यासह आदींची यावेळी उपस्थिी होती.दरम्यान ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले होते.

शिवसेनेच्या उपनेत्या सुष्मा अंधारे यांनी आज डॉ.संपदा मुंडे यांच्या कुटूंबियांची भेट घेतली. यावेळी माध्यमांशी बोलतांना अंधारे म्हणाल्या की, या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायालयीन समिती नेमण्यात यावी अशी आमची मागणी आहे. या प्रकरणात मला धमक्या येत असल्या तरी मी त्या धमक्यांना घाबरणार नाही. आमची लेक गेली, या लेकीला न्याय मिळवून देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करणार आहोत. ज्यांच्यावर या प्रकरणात आरोप झाले आहेत त्यांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जातात म्हणजे ही आश्चर्याची बाब नव्हे का? या प्रकरणी 3 तारखेला फलटण येथे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सुष्मा अंधारे यांनी म्हंटले आहे.
दरम्यान यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपालीताई ठोंबरे, शिवसंग्रामच्या ज्योतीताई मेटे, शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास गिराम यांच्यासह आदींची उपस्थिती होती. दरम्यान एसआयटी चौकशीच्या मागणीसाठी ग्रामस्थ पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत होते. ताईला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपींना फाशी झालीच पाहिजे यासह इतर फलक हातात घेवून गावकरी आंदोलन करत होते.








