
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
बीड (रिपोर्टर)- गेवराई तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर अखेर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. आठवडाभरापूर्वी ‘बीड रिपोर्टर’ने या वाळू तस्करीबाबत वृत्त प्रसिद्ध करून माफिया व महसूल-पोलिस अधिकार्यांची मिलीभगत उघडकीस आणली होती. याची दखल घेत पोलिस अधीक्षक नवनीत कौवत यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईचे कठोर आदेश दिले. त्यानुसार, रविवारी पहाटे दोन हायवा जप्त करण्यात आल्या.
स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या आदेशाने पोउपनि श्रीराम खटावकर, पोह. वरपे, राठोड व राहुल शिंदे यांच्या पथकाने तलवाडा फाटा व नागझरी परिसरात सापळा रचला. पहाटे एकच्या सुमारास गोदावरी नदीपात्रातून वाळू भरून जात असलेल्या दोन हायवा दिसताच पथकाने पाठलाग केला. पोलिसांनी थांबण्याचा इशारा करताच चालकांनी हायवा रस्त्याच्या कडेला थांबवून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. जप्त करण्यात आलेल्या हायवांची क्रमांक एम.एच.23 यू 2757 आणि एम.एच.25 जे. 3555 अशी आहेत. दोन्ही वाहनांत मिळून अंदाजे दहा ब्रास वाळू असून तिची किंमत सुमारे 50 हजार रुपये तर हायवांची किंमत मिळून सुमारे 50 लाख रुपये इतकी आहे. एकूण 50 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून चालक व मालकाविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर व पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.





