जरांगेंना वाटतं, मी या पृथ्वीतलावरच नसावं
सीबीआय चौकशीची मागणी आता मी सोडणार नाही -मुंडे
बीड/परळी (रिपोर्टर): मनोज जरांगेंचं आणि माझं वैर काय? काहीच नाही. मी फक्त गेल्या सभेत जरांगेंना दोन प्रश्न विचारले, त्याचं उत्तर अद्याप आलं नाही. मराठ्यांना ओबीसीतून की ईडब्ल्यूएसमधून फायदा होणार? याचं उत्तर जरांगे यांनी दिले नाही. होऊन जाऊ द्या, दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी. थेट व्यासपीठावर या, प्रश्नाचं उत्तर द्या, असे आव्हान देत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल करताना मारामारीची प्रवृत्ती आमची नाही, तुम्ही हाकेंना मारलं, वाघमारेंना मारलं आणि आता माझ्याकडून त्यांना धोका, असं म्हणतायत. अटक झालेले कार्यकर्ते त्यांचेच. होऊन जाऊद्या एकदाच. या प्रकरणाची सीबीआय चौकशी तर झालीच पाहिजे. त्याचबरोबर अटक केलेले, मनोज जरांगे आणि माझी ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करा, जरांगेंना वाटतं धनंजय मुंडे या पृथ्वीवरच नसावा. मी या प्रेसच्या माध्यमातून पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडूनच करा. आता मीही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही धनंजय मुंडे यांनी दिला.
आज सकाळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात सुपारी बॉम्ब फोडल्यानंतर धनंजय मुंडेंनी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास परळीतील जगमित्र कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. अत्यंत आक्रमक होत धनंजय मुंडे म्हणाले, गेली तीस वर्षे मी राजकीय-सामाजिक जीवनात काम करत आहे, मी जात पाहून कधीच राजकारण केले नाही. मी ज्या जातीत जन्मलो त्यापेक्षा जास्त अन्य जातीत माझे मित्र आहेत. जात-पात न पाळण्याचे माझ्यावर संस्कार आहेत. मी जेव्हा सर्वप्रथम जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झालो, त्या वेळी मराठा आरक्षणाचा पहिला ठराव जिल्हा परिषदेतून मी दिला. त्यानंतर राज्यभरात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायती असे ठराव देऊ लागल्या. मराठा आंदोलनात अनेक वेळा मी सहभागी झालेलो आहे. जरांगे यांच्या आंदोलनाला मदत आणि सहकार्य मी केलेले आहे. स्व. अण्णासाहेब जावळे, स्व. विनायकराव मेटे, संभाजी महाराज यांच्या खांद्याला खांदा लावून मी मराठा आरक्षणाचा लढा दिलेला आहे. जेव्हा 58 मोर्चे निघाले तेव्हा मुंबईत त्या मोर्चामध्ये मला बोलण्यास संधी मिळाली. विरोधी पक्षनेता असताना आरक्षणासाठी मी सभागृह बंद पाडली. कोपरडीत बलात्कार झाला तेव्हा तेथे मी सर्वप्रथम पोहचलो. आरोपींना अटक होईलपर्यंत अधिवेशन चालू दिले नाही. पालकमंत्री असताना बीड जिल्ह्यात 80 हजार कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहेत. एकदा मनोज जरांगे यांनी माझ्या हाताने उपोषण सोडले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीची सभा वगळता मी कधीही मनोज जरांगे यांच्या विरोधात बोललो नाही. मनोज जरांगेंना वाटतं, धनंजय मुंडे पृथ्वीतलावर नसावा, त्या सभेत मी दोन प्रश्न विचारले होते, त्या प्रश्नांचे उत्तर मिळाले नाही. एकदा समोरासमोर या आणि मराठा समाजाला ओबीसीतून जास्त फायदा की ईडब्ल्यूएसमधून जास्त फायदा हे दाखवून द्या, महाराष्ट्रालाही कळू द्या, असे म्हणत धनंजय मुंडे म्हणाले, छत्रपती शिवरायांनी जो गावगाडा तयार केला ती गावागावातली गावगाड्याची घडी आता विस्कटली आहे. जरांगेंच्या विचाराचा व्यक्ती सख्ख्या भावालाही मानायला तयार नाही. त्या वेळेस अनेकांची घरे जाळली. ती पिलावळे कुणाची ? असा सवाल धनंजय मुंडे यांनी विचारत आम्ही तर कुणाची घरे जाळली नाहीत. बोला, कधी आहे तुमची तयारी, मी विचारलेल्या प्रश्नांवर बोलण्याची. मारामारीची प्रवृत्ती आमची नाही, तुम्ही हाकेंना मारलं, वाघमारेंना मारलं आणखी किती जणांना मारलं, मला आश्चर्य वाटतं, माझ्याकडून त्यांना धोका. माझं आणि त्यांचं वैर काय? एवढच ओबीसीतून आरक्षण घेऊ नका, असं मी म्हणत आलो. अनेक लोक येतात, बोलतात, भेटतात, बाजुला नेतात, अटक झालेले कार्यकर्ते त्यांचेच आणि आरोप माझ्यावर. माझी इमेज मर्डरर म्हणून करण्याचे काम जरांगे करत आहेत. या सर्व प्रकरणाची चौकशी आता झाली पाहिजे. माझ्या मनात जर हे पाप आले असेल, हे म्हणत धनंजय मुंडे म्हणाले, माझी, जरांगे आणि पकडलेल्या आरोपींची ब्रेन मॅपिंग, नार्कोटेस्ट करा, उठसुठ कायही बोलायचं, आय-माय काढायची, आपल्या आई बहिणीला कुणी शिवी दिली तर काय वाटेल, आम्ही तरीही गप्प बसलो. त्यांच्याकडे काय आहे, चार दिवसाने काय होणार? जेवढं खोटं कराल, तेवढं मनोज जरांगे तुम्हाला महागात पडेल, मला संपवायचं, असं मनोज जरांगे म्हणाले. कधी मुख्यमंत्र्यांना संपवण्याची धमकी देतात, समाजा-समाजात अंतर हे अंतरवलीतून पडले. असं म्हणत तुमच्या मेहुण्याचे वाळूचे ट्रक किती आहेत? हा सवालही धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. माझे तोंड प्रभू वैद्यनाथाकडे आहे, मी खरं बोलतोय, मला जीवनातून उठवू नका, आपले वैर ते काय? आरक्षण ओबीसीतून घेऊ नका, थोतांडगिरी बंद करा, मराठा समाजाला वाटते की, जरांगेंमुळे आपलं बरं होईल, परंतु मला तसं वाटत नाही. शेवटी किलांशी चर्चा करून अब्रू नुकसानी दाव्याबाबत निर्णय घेणार असल्याचेही धनंजय मुंडे यांनी या वेळी म्हटले.












