बीड (रिपोर्टर): राज्यातील शेतकर्यांवर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. आधी कर्जबाजारी व्हायचं आणि नंतर पुन्हा कर्जमाफी मागायची, हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे, असे मुक्ताफळ त्यांनी उधळले.
विखे पाटील म्हणाले की, सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, मग कर्ज माफ करून घ्यायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची, हे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यांच्या या विधानानंतर शेतकरी नेत्यांसह सोशल मीडियावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी हे वक्तव्य शेतकर्यांचा अपमान करणारे असल्याचे सांगत मंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमधील काही मंत्री आणि नेत्यांकडून शेतकर्यांविषयी वादग्रस्त वक्तव्ये करण्यात येत आहेत. त्या मालिकेत आता विखे पाटील यांच्याही वक्तव्याची भर पडली आहे.
अजित नवलेंचा राधाकृष्ण विखे पाटलांवर हल्लाबोल
सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्ज माफ करून घ्यायचं, आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची, वक्तव्याचा शेतकरी नेत्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. किसान सभेकडून त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला. अजित नवले म्हणाले की, राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकर्यांनाच दोषी ठरवण्याचं काम केलं आहे. त्यांनी सांगितले की, शेतकर्यांचे कर्ज सरकारी धोरणांचा परिणाम आहे. शेतकर्यांना लुटीची धोरणे राबवायची, आयात निर्यात धोरणे प्रभावित करायची आणि महागाईच्या नावाखाली भाव पाडायचे. शेतकर्यांना मदत करण्याऐवजी पिक विमा कंपन्यांचे नफे फुगवायचे हे सरकारचे धोरण आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे. विखेंप्रमाणेच मंत्रीमंडळातील अनेक सहकारी अशाच प्रकारचे वक्तव्ये करत आहेत. निवडणुकीपूर्वी यांनीच कर्जमाफीची आश्वासनं द्यायची, मते घ्यायची आणि शेतकरी संघटनांनी तीच मागणी केल्यानंतर त्यांनाच प्रताडित करायचं हे चालू राहिलं, तर याचा प्रतिकार करावा लागेल.










