बीडच्या महिलेने तक्रार दिल्यानंतर संभाजीनगरच्या गायधनीवर गुन्हा
बीड (रिपोर्टर): शादी डॉटकॉमवर ओळख झालेल्या व्यक्तीने घटस्फोटीत महिलेस ‘तुझ्या सोबत विवाह करतो, तुझ्या मुलालाही स्विकारतो’, असे आश्वासित करत त्या महिलेशी सातत्याने शरीर संबंध ठेवले. त्यातून घटस्फोटीत महिला गरोदर राहिली. तो गर्भही बळजबरीने रुग्णालयात जाऊन पाडला. यासह ‘तुझे व्हिडिओ, फोटो व्हायरल करील’ ‘तुला माझ्याशिवाय पर्याय नाही, मी आता तुझ्याशी विवाह करणार नाही’, असं म्हणत सातत्याने धमक्या दिल्या प्रकरणी संभाजीनगर येथील भूषण गायधनी याच्या विरोधात सदरील घटस्फोटीत महिलेच्या फिर्यादीवरून बलातकारासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड येथील 38 वर्षीय सुशिक्षित नोकरदार घटस्फोटीत महिलेने 2019 साली शादी डॉटकॉमवर विवाहसाठी आपला परिचय दिला. तेव्हा संभाजीनगरच्या सारावाटीका परिसरात राहणार्या भूषण शिरीष गायधनी याने संबंधित महिलेशी संपर्क साधला आणि लग्नाचा प्रस्ताव ठेवला. त्यावेळी महिलेने माझ्याशी लग्न करायचे असेल तर माझ्या मुलाला स्विकारावे लागेल, असे म्हटले. तेव्हा गायधनी यांनी आपल्याला विचार करण्यासाठी वेळ द्या, असे म्हटले. पुढे लग्नास नकारही दिला. मात्र काही दिवसांनी गायधनी यांनी सदरील महिलेशी संपर्क साधून आपण विवाहसाठी इच्छूक असल्याचे सांगत मुलाला स्विकारण्याची तयारी दर्शविली. या कालावधीत संबंधित गायधनी याने अनेक वेळा महिलेसोबत लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. त्यातून ती गर्भवती झाली. तिच्या इच्छेविरोधात संभाजीनगरच्या धनश्री हॉस्पिटलमध्ये गर्भपात केला.
पुढे लग्नाचा विषय काढल्यानंतर तो टाळाटाळ करायचा, शेवटीतर गायधनी याने तुझे फोटो, व्हिडिओ व्हायरल करील, असे म्हणत बळजबरी मारहाण करण्यास, शारीरिक मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. अखेर संबंधित महिलेने बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरून आरोपीविरोधात बलात्कारासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.










