बीड (रिपोर्टर): बीड नगरपालिकेतील वसुली विभागात कार्यरत असलेल्या कर्मचार्याने नगरपालिकेच्या छतावरील शिडीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी उघडकीस आली. आत्महत्या करण्यापूर्वी संबंधित कर्मचार्याने सुसाईड नोट मोबाईलच्या नोटबुकमध्ये लिहिल्याचे समोर आले असून प्रमोशन करताना मला डावलून अनुभव नसणार्यांना डीपीओ यांनी प्रमोशन दिले तर तत्कालीन मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी सीआरवर मार्क कमी केले. वसुली विभागातील सम्राट कदम, विश्वंभर तिडके यांनी ‘दाम करी काम’ एवढेच काम केले. तर चंद्रकांत काळे यांनी माझा पुरेपूर फायदा घेतला. यासह व्यवहार आणि घरातील अन्य बाबी संबंधिताने लिहून ठेवल्या. आत्महत्या करणार्या कर्मचार्याचे नाव अविनाश धांडे आहे.
अविनाश धांडे हे गेल्या अनेक वर्षांपासून बीड नगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत. सध्या ते वसुली विभागामध्ये काम करत होते. आज सकाळी त्यांचा मृतदेह बीड नगरपालिकेच्या इमारतीच्या छतावर एका शिडीला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती तात्काळ बीड शहर पोलिसांना देण्यात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळ पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड जिल्हा रुग्णालयात पाठविला.
सदरील कर्मचार्याने आत्महत्या करण्यापूर्वी त्याच्या मोबाईलमधील नोटबुकमध्ये एक सुसाईड नोट लिहून ठेवल्याचे समोर आले आहे. तत्कालीन मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्यासह वसुली विभागातील सम्राट कदम, विश्वंभर तिडके, चंद्रकांत काळे यांनी कशाप्रकारे त्रास दिला त्याचबरोबर डीपीओ वाघमारे यांनी ज्यांना अनुभव नाही, त्यांना प्रमोशन दिले. असेही म्हटले. पुढे पॉलिसी, कोणाकड किती पैसे, यासह अन्य बाबी धांडे यांनी आपल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवल्या. या आत्महत्येनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.










