गेवराई (बीड) – गेवराई पोलीस ठाण्यातील हवालदार विजय दिगंबर आघाव हा लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाच्या जाळ्यात अडकला आहे. शनिवारी (दि. ८ नोव्हेंबर) सकाळी पोलीस दलाने अवैध वाळू वाहतूक करणारे एक वाहन पकडले होते. या प्रकरणात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यातील आरोपीला अटक न करण्यासाठी आणि तपासात मदत करण्याच्या मोबदल्यात हवालदार आघाव याने तक्रारदाराकडे २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने या प्रकरणाची तक्रार बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केली.
यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचून गेवराई शहरात सायंकाळी सुमारे पावणे सात वाजता हवालदार विजय आघाव याला २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सोपान चिट्ठमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. प्रदीप सुरवसे, पो.ह. अविनाश गवळी, पो.हे. अमोल खरसाडे आणि पो.ह. अंबादास पुरी यांच्या पथकाने केली.
एसीबीच्या या कारवाईमुळे गेवराई पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली असून या घटनेमुळे स्थानिक पोलीस यंत्रणेच्या प्रामाणिकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.












