मुंबई, (रिपोर्टर)ः- सध्या राज्यातील राजकीय वातावरण पाहिलं, तर कुठे फूट पडून एकाचे दोन पक्ष झाले आहेत, तर कुठे एकाच पक्षात गटातटाचं राजकारण सुरु आहे. तरीही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता परिस्थितीनुसार काही ठिकाणी दोन पक्ष एकत्र येण्याची चिन्हं दिसत आहेत. अशीच परिस्थिती कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा आहे, तर दुसरा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार या नावाने ओळखला जातो. मात्र कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन्ही गटांमध्ये ऐतिहासिक एकीचा निर्णय घेण्यात आला आहे.
डॉ. नंदाताई बाभुळकर (शरद पवार गट) आणि माजी आमदार राजेश पाटील (अजित पवार गट) यांनी एकत्र येऊन ’राजर्षी शाहू विकास आघाडी’च्या नावाखाली निवडणुका युती करुन लढवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती गडहिंग्लज येथे पत्रकार परिषदेत मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.
ही युती खास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्त्वाखाली झाली असून या बैठकीत दोन्ही गटांच्या नेत्यांनी पक्षाच्या एकात्मतेसाठी आणि विकासासाठी पुरोगामी विचारांनी एकत्र येण्याचे महत्त्व अधोरेखित केले. मंत्री हसन मुश्रीफ यांनी युतीमुळे चंदगड नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय निश्चित होईल, असाही विश्वास यावेळी व्यक्त केला. तसेच भाजप पुरस्कृत शिवाजी पाटील यांच्याविरुद्ध एकमताने लढा देण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
राजेश पाटील यांनी या युतीत काँग्रेसमधील अनेक कार्यकर्ते आणि सामाजिक नेत्यांचे समर्थन मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. मतदारांना पुरोगामी आणि विकासात्मक पक्षाच्या धोरणांवर विश्वास वाटावा, यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे दोन्ही नेत्यांनी सांगितले. दोघेही याआधी विधानसभा निवडणुकांत वेगळ्या गटांतून लढले होते, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आता त्यांनी राजकीय भिन्नता बाजूला ठेवण्याचा निर्णय घेतला आहे











