बीड / छ. संभाजीनगर, (रिपोर्टर)ः-दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात काल बॉम्ब स्फोट झाला. यात 13 जण ठार तर अनेक जण गंभीर जखमी झाले. सदरच्या बॉम्ब स्फोटाने उभ्या देशात खळबळ उडालीअसून मराठवाड्यातील विविध मंदिरे, धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे अलर्ट मोडवर ठेवण्यात आली आहे. छ.संभाजीनगरमध्ये भद्रा मारोती सह अन्य ठिकाणच्या मंदिरात जाणार्या वाहनांची तपासणी केली जात आहे. तर इकडे तुळजापुरातही भवानी मंदिराची सुरक्षा वाढविली आहे.
दिल्लीमध्ये काल शक्तीशाली बॉम्बस्फोट झाला. या बॉम्ब स्फोटाने 13 निष्पापांचे जिव घेतले तर अनेक जण जखमी झाले. तपासी यंत्रणा या प्रकरणाचा एकीकडे तपास करत असतांना दुसरीकडे मराठवाड्यातील धार्मिक, अध्यात्मिक, प्रेक्षनिय स्थळ अलर्ट मोडवर ठेवले गेले आहेत. महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजा भवानी मंदिरामध्ये सुरक्षा वाढविण्यात आली आहे. या ठिकाणी राज्यभरातुन नव्हे तर देशभरातून अनेक भावीक भक्त देवीच्या दर्शनासाठी येतात. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पुर्ण तपासणी नंतर भावीकांना मंदिरात सोडले जात आहे. एक्सरे स्कॅनर मशीनच्या माध्यमातून महिलांच्या बॅगा, पर्स इतर साहित्यांची कडक तपासणी केली जात आहे. तिकडे छ.संभाजीनगरमध्ये ही भद्र मारूती या ठिकाणी तपासणी होत असून वेरूळ आणि छ.संभाजीनगर शहरातील अन्य प्रेक्षणिय स्थळावर पोलिसांची बारीक नजर असल्याचे सांगण्यात येते.











