भिमराव धोंडे समर्थकांसह मुंबईकडे रवाना, दु.3 नंतर राष्ट्रवादीत होणार प्रवेश
मुंबई / बीड (रिपोर्टर)ः- स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या अनुशंगाने बीड जिल्ह्यात मोठ्या राजकीय उलथापालथी होवू लागल्या असून आज माजी आ.भिमराव धोंडे हे भाजपाला राम राम ठोकत दुपारनंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीत डेरे दाखल होत आहेत. त्यात आता दुसरी एक राजकीय घडामोड बीड जिल्ह्यात घडली असून शिंदे सेनेचे माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी आज दुपारी 12 वाजता मातोश्रीवर उध्दव ठाकरेंच्या हाताने शिव बंधन बांधत ठाकरेंच्या शिवसेनेत जाहिर प्रवेश केला आहे. यावेळी कुंडलिक खांडे यांनी मोठे शक्तीप्रदर्शन केल्याचेही दिसून आले.
गेल्या काही वर्षापुर्वी ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख असलेले कुंडलिक खांडे हे ठाकरे सेनेतून बाहेर पडून शिंदे सेनेत डेरे दाखल झाले होते. तेथून ही ते गेल्या वर्षेभरापुर्वी बाहेर पडले. अखेर आज त्यांनी पुन्हा ठाकरे सेनेत जाण्याचा निर्णय घेतला. रात्री उशीरा कुंडलिक खांडे यांनी मुंबईकडे आपल्या समर्थकांसह कुच केली. दुपारी 12 वाजता मातोश्रीवर कुंडलिक खांडे यांचा जाहिर प्रवेश झाला. उध्दव ठाकरे यांच्या हाताने शिवबंधन बांधून कुंडलिक खांडे यांनी बीड जिल्ह्यात ठाकरे सेनेची ताकद वाढविण्याचे वचन उध्दव ठाकरे यांना दिले. यावेळी शिवसेनेचे नेते अंबादास दानवे, गणेश वरेकर, परमेश्वर सातपुते यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. दुसरीकडे आष्टी पाटोद्याचे माजी आ.भिमराव धोंडे हे सकाळीच समर्थकांसह मुंबईकडे रवाना झालेले आहेत. धोंडे हे भाजप सोडून अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये डेरे दाखल होत आहेत. दुपारी 3 नंतर धोंडे यांचा अजित दादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होणार आहे. बीड जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या अनुषंगाने प्रचंड उलथापालथी होतांना दिसूनयेत आहेत.
चौकट
कोण कुठे जाणार?
बीड जिल्ह्यामध्ये प्रचंड महत्वकांक्षा असणारे नेते, लोकप्रतिनिधी सर्वच मतदार संघामध्ये आणि तालुक्यांमध्ये दिसून येतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने सध्या जिल्ह्यात अनेक राजकीय उलथापालथी होत आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांपासून ते आमदाराच्या पीए पर्यंत… या उलथापालथी होतांना दिसून येतात. जयदत्त क्षीरसगार हे कुठल्या पक्षात प्रवेश करणार? हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे. मात्र, त्यांचे पुतणे तथा आ.संदीप क्षीरसागर यांचे धाकटे बंधू हेमंत क्षीरसागर हे भाजपात डेरेदाखल होत असल्याचे सुत्रांचे सांगणे आहे. तर आ.संदीप क्षीरसागर यांचे स्वीय सहाय्यक सतीष शेळके हे शिंदे सेनेत डेरेदाखल होणार आहेत. तिकडे आष्टी पाटोद्याचे माजी आ.भिमराव धोंडे हे कमळाचे देट खुडत हातात घड्याळ बांधणार आहेत. इकडे कुंडलिक खांडेनी मशाल हाती धरली आहे.










