बीड | रिपोर्टर
वायभटवाडी चौकामध्ये अवैध गावठी पिस्तुल जवळ बाळगून दहशत माजवणाऱ्या इसमा विरुद्ध पिंपळनेर पोलीसांनी तात्काळ कारवाई करत अटक केली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कावत यांनी सुरू केलेल्या गुंडगिरीविरोधी मोहिमेला ही कारवाई अधिक बळ देणारी ठरली आहे. सदरची कारवाई ही पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मधुसूदन धुगे यांनी केली
दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मधुसूदन घुगे यांना माहिती मिळाली की, संदीप उर्फ रमेश महादेव इंगोले (वय 33, रा. बार्शी नाका, बीड) हा अवैधरित्या गावठी पिस्तुल बाळगून वायभटवाडी चौकात लोकांना धमकावत फिरत आहे. फिर्यादी यशराज जाधव (वय 19, रा. वायभटवाडी) यास आरोपीने पिस्तुल डोक्याला लावून जिवे मारण्याची धमकी दिली, अशी महिती मिळताच तात्काळ पथक रवाना करण्यात आले.
सपोनि घुगे व त्यांच्या पथकाने बीड बायपास येथे आरोपीला ताब्यात घेतले असता एक अवैध गावठी पिस्तुल, एक जिवंत काडतूस व स्कॉर्पिओ (क्र. MH 23 BB 5505) असा मुद्देमाल मिळाला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गु.र. नं. 330/2025 अन्वये कलम 109, 352, 351(2) भा.दं.वि. तसेच कलम 3/25 भा.ह.का. व कलम 135 म.पो.का. प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असून आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात सहा. पोलीस निरीक्षक मधुसूदन घुगे, पोउनि अर्जुन गोलवाल, पोह. आबुबकर शेख, पोह. बांगर, पोशि. सादेक पठाण व चा. पोह. महेश गर्ने यांनी सहभाग घेतला.
बीड जिल्ह्यातील गुंडगिरीचे पूर्ण उच्चाटन करण्यासाठी अशा तत्पर आणि कठोर कारवाया पुढेही सुरूच राहणार असल्याचे संकेत पोलीस अधीक्षक श्री. कावत व अपर पोलीस अधीक्षक श्री. पांडकर यांनी दिले आहेत.









