नागपूर (रिपोर्टर): एकीकडे नागपूरमधलं तापमान आज 8.5 अंश सेल्सियस एवढं नोंदवलं गेलं. ते पुढे काही दिवस दोन अंशाने घटणार असल्याने नागपुरात कडाक्याची थंडी पडली असताना दुसरीकडे उद्यापासून नागपुरात अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात जमीन घोटाळा, कर्जमाफी, महिला अत्याचार, तपोवन वृक्षतोड, शेतकर्यांचा प्रस्ताव यावर सरकाला घेरण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होईल. त्यामुळे हे अधिवेशन चांगलेच तापणार असल्याचा अंदाज येत आहे.
राज्याच्या उपराजधानीत उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. गेल्या सहा महिन्याच्या कालखंडात राज्यात अनेक ज्वलंत विषय चर्चेत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने जमीन घोटाळा, कर्जमाफी, महिला अत्याचार या विषयांकडे पाहिलं जातं तर अधिक आणि आक्रमकपणे चर्चेत असलेला नाशिक कुंभमेळ्यासाठी वृक्षतोडीचा विषयही तेवढाच सरकारसाठी तापदायक असणार आहे. त्यापाठोपाठ शेतकर्यांबाबत सरकार किती दुर्लक्षित आहे याचे उदाहरण देशाच्या सर्वोच्च सदनात केंद्रीय कृषीमंत्री यांनी केलेल्या खुलाश्यातून समोर आले. राज्य सरकारने शेतकर्यांच्या मदतीबाबतचा प्रस्ताव पाठवला नाही, असे आधी कृषीमंत्र्यांकडून सांगण्यात आले. नंतर तो प्रस्ताव 27 नोव्हेंबरला पाठवल्याचे सांगितले गेले. यातून राज्य सरकारची दिरंगाई समोर आली. हा विषयही अधिक आक्रमकतेने विरोधकांकडून मांडला जाईल. अधिवेशनामुळे नागपुरात आत्ताच पुढार्यांसह कार्यकर्त्यांची रेलचेल पहायला मिळत आहे. यावर्षी थंडीचा कडाका अधिक वाढला आहे. आज नागपूरचे तापमान हे 8.5 एवढे नोंदवले गेले असून पुढे हे तापमान आणखी दोन टक्क्याने घसरणार असल्याचे सांगण्यात येते. कडाक्याच्या थंडीमध्ये राज्य सरकारवर अनेक विषय या वेळी शेकणार असल्याने या अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष असणार आहे. विदर्भासह मराठवाड्यासाठी या अधिवेशनात काय निर्णय होतात याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.









