बीडमध्ये खळबळ, आतापर्यंतची विभागातील सर्वात मोठी लाच कारवाई
बीड | रिपोर्टर
बीड जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक आटोपल्यानंतर अवघ्या काही वेळातच सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लिंगन्ना लखमावाड यांना ४५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. पालकमंत्र्यांचा दौरा सुरू असतानाच घडलेल्या या धाडसी कारवाईने शासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस लखमावाड उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर ते कार्यालयात जाऊन काही वेळ थांबले आणि त्यानंतर नगर नाका परिसरातील त्यांच्या राहत्या घरी गेले. दरम्यान, एसीबीचे पथक दोन तासांपासून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून योग्य संधीची प्रतीक्षा करत होते.
तक्रारदार हे वन परिक्षेत्र अधिकारी असून त्यांच्या विविध प्रशासकीय कामांसाठी लखमावाड यांनी तब्बल ४५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार २९ जुलै रोजी एसीबीकडे करण्यात आली होती. वृक्ष लागवड निधी वितरित करण्यासाठी १२ टक्के कमिशन, निलंबनाचा प्रस्ताव पुढे न पाठवणे, प्रलंबित दोन वेतनवाढ मंजूर करणे तसेच नर्सरी कामाच्या चौकशीत सहकार्य करण्यासाठी ही लाच मागण्यात आल्याचा आरोप आहे.
एसीबीने तक्रारीची पडताळणी करून सापळा रचला. शुक्रवारी दुपारी तक्रारदार ५ लाख रुपयांच्या खऱ्या नोटा आणि उर्वरित ४० लाख रुपयांच्या खेळण्यातील नोटा घेऊन आरोपीच्या घरी पोहोचले. लखमावाड यांनी रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. त्यानंतर आरोपीला ताब्यात घेऊन बीड येथील एसीबी कार्यालयात आणण्यात आले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
ही कारवाई एसीबी छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब शिंदे, पोलीस निरीक्षक भास्कर नवले तसेच भीमराज जिबडे, पुष्पा दराडे, अनवेज शेख, प्रकाश डोंगरदिवे आणि रामेश्वर ताठे यांच्या पथकाने केली.
दरम्यान, कारवाईनंतर पोलीस अधीक्षक माधुरी केदार यांनी बीड येथील एसीबी कार्यालयाला भेट देऊन कारवाई करणाऱ्या पथकाचे अभिनंदन केले. विभागातील आतापर्यंतची सर्वात मोठ्या लाच रकमेवरील कारवाई असल्याचे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.









