मुंबई/ऑनलाईन रिपोर्टर
बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका लाटल्याच्या प्रकरणात राज्याचे क्रीडामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांची दोन वर्षाची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे. माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. उच्च न्यायालयात जोपर्यंत शिक्षेला स्थगिती मिळत नाही, तोपर्यंत अटकेची टांगती तलवार असेल. दरम्यान माणिकराव कोकाटे यांची प्रकृती खालावली असून त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.
ॲड. माणिकराव कोकाटे मंत्री झाल्यापासून विविध कारणांमुळे वादात अडकले होते. शेतकरी कर्जमाफीबद्दल त्यांनी केलेले विधान किंवा विधिमंडळात मोबाइलवर गेम खेळण्याचे प्रकरण असो, पक्षाने वेळोवेळी त्यांची बाजू सावरून घेतली होती. मात्र बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत कोकाटे गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना उधाण आले.
सदनिका लाटल्याचे प्रकरण काय आहे?
मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका बनावट दस्तावेज देऊन लाटल्याचा आरोप माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांच्यावर करण्यात आला होता. त्यांना प्रत्येकी दोन वर्षाचा कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.









