बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यातील सहा नगरपालिकांच्या निवडणुकांनंतर सत्तेचे चित्र वरकरणी स्पष्ट दिसत असले तरी प्रत्यक्षात राजकीय पटावर मोठा ‘पॉवर गेम’ सुरू झाला आहे. गेवराई, धारूर आणि परळी येथे भाजपा व अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला निर्विवाद बहुमत मिळाल्याने एकहाती सत्ता निश्चित झाली आहे. मात्र बीड, अंबाजोगाई आणि माजलगाव या नगरपालिकांमध्ये अध्यक्ष एकाचा, तर बहुमत दुसर्याच पक्षांकडे असल्याने सत्तेची गणिते पूर्णतः बदलली आहेत.
राजपत्र प्रसिद्ध झाल्यानंतर 25 दिवसांच्या आत पहिली सर्वसाधारण सभा घेण्याचे निर्देश असल्याने, या कालावधीतच उपाध्यक्षपद व महत्त्वाच्या समित्यांसाठी राजकीय जुळवाजुळव रंगणार आहे. चार वर्षांच्या प्रशासक राजवटीनंतर स्थापन होणारे हे नवे सभागृह असल्याने पहिल्याच बैठकीत सत्ता कुणाच्या हातात जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.परळी, गेवराई आणि धारूर या नगरपालिकांमध्ये सत्तासंघर्षाची कोणतीही शक्यता नाही. परळीत माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे वर्चस्व कायम राहणार आहे. गेवराईत बाळराजे पवार, तर धारूरमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली संबंधित पक्षाची एकहाती सत्ता राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
खरी राजकीय कसोटी मात्र बीड, अंबाजोगाई आणि माजलगावमध्ये आहे. बीड नगरपालिकेत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या प्रेमलता पारवे नगराध्यक्ष झाल्या असल्या तरी नगरसेवकांचे संख्याबळ त्रिशंकू आहे. येथे अजित पवार गट – 19, भाजपा – 15, शरद पवार गट – 12, शिवसेना (शिंदे गट) – 3, एमआयएम – 1, काँग्रेस – 1 आणि ठाकरे गट – 1 असे चित्र आहे. त्यामुळे उपाध्यक्षपद व समित्यांसाठी इतर पक्षांचा पाठिंबा मिळवणे हेच सत्तेची किल्ली ठरणार आहे. अंबाजोगाईत भाजपा आमदार नमिता मुंदडा यांच्या सासर्यांना नगराध्यक्षपद मिळाले असले तरी संख्याबळाच्या राजकारणात ‘पापा मोदी’ गट सरस ठरला आहे. या गटाचे 20 नगरसेवक निवडून आल्याने उपाध्यक्षपद व समित्यांवर त्यांचे वर्चस्व राहण्याची दाट शक्यता आहे. माजलगावमध्येही चित्र वेगळे नाही. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष असला तरी त्यांना फक्त 10 नगरसेवक मिळाले आहेत. आमदार प्रकाश सोळंके गटाचेही तेवढेच संख्याबळ असून, उर्वरित पक्ष व अपक्ष निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे येथेही सत्तेसाठी तडजोडीचे राजकारण अटळ आहे. एकूणच बीड जिल्ह्यातील तीन नगरपालिकांमध्ये पुढील 25 दिवस हे केवळ औपचारिक वाट न पाहता, सत्तेची दिशा ठरवणारे ठरणार आहेत. कोण कुणाच्या बाजूने उभे राहते आणि कोणत्या नगरपालिकेत ‘एकहाती सत्ता’ प्रत्यक्षात साकारते, याकडे जिल्ह्याचे लक्ष केंद्रीत झाले आहे.









