बीड : बीड शहरातील बसस्थानक व सिव्हिल हॉस्पिटल परिसरात सातत्याने मोबाईल चोरी, जबरी चोरी, नागरिकांना अडवून बळजबरीने पैसे काढून घेणे, खिशातून पैसे लंपास करणे, मारहाण तसेच खून प्रयत्नासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या सराईत आरोपीस बीड शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने शिताफीने अटक केली असून त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव दीपक संतोष भोरे (रा. खडकपुरा पेठ, बीड, ता. व जि. बीड) असे आहे. सदर आरोपीवर यापूर्वी खून, मारहाण, जबरी चोरी व चोरीसह विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद असून तो सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
हा आरोपी विशेषतः मोबाईल चोरी करण्याच्या सवयीचा असून बसस्थानक व सिव्हिल हॉस्पिटलसारख्या गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी संधी साधून गुन्हे करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. गुन्हे केल्यानंतर तो नाशिक येथे पळून जाऊन तेथे वास्तव्य करत होता. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे डीबी पथकाने त्याचा माग काढत त्याला अटक केली.
या कारवाईमुळे बसस्थानक व सिव्हिल हॉस्पिटल परिसरात होणाऱ्या चोरी व जबरी चोरीच्या घटनांना आळा बसणार असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होणार आहे. वारंवार गुन्हे करणाऱ्या अशा सराईत आरोपींवर तडीपारीसारखी कडक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कावत यांनी दिले आहेत.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर व उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. शीतलकुमार बल्लाळ, पोलीस उपनिरीक्षक श्री. महेश जाधव, पोलीस हेडकॉन्स्टेबल श्री. संदीप आघाव, श्री. मनोज जायभाय तसेच पोलीस अंमलदार गहिनीनाथ बावनकर, इलियास शेख, राम पवार व मंगेश शिंदे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.









