वडवणी / धारूर, (रिपोर्टर)ः- धारूर शहरातील बुलढाणा अर्बन बँक बंद पडणार असल्याची अफवा काही जणांनी सोडल्याने खातेदारांनी आपल्या बँकेतील पैसे आणि सोने काढून घेण्यासाठी आज सकाळपासूनच गर्दी केली होती. असाच प्रकार वडवणी शहरामध्ये झाल्याचे दिसून आले आहे.
बीड जिल्ह्यातील मागील काही वर्षात मल्टीस्टेट, पतसंस्था बहुतांश बंद झालेल्या आहेत. या बंद पडलेल्या बँकेत खातेदारांचे लाखो रूपये अडकलेले आहेत. कधी कोणत्या बँकेला आणि पतसंस्थेला कुलूप लागेल हे सांगता येत नाही. आज धारूर शहरातील बुलढाणा अर्बन बँक बंद पडल्याची अफवा उठविण्यात आली आणि या अफवेला बळी पडत अनेक खातेदारांनी आपले पैसे आणि सोने काढून घेण्यासाठी बँकेसमोर गर्दी केली होती. अचानक वाढलेल्या या गर्दीमुळे बँकेचे कर्मचारी ही चांगलेच अवाक झाले होते. असाच प्रकार वडवणी शहरामध्ये कालपासून झालेला आहे. या प्रकाराने दोन्ही शहरात एकच खळबळ उडाली.









