गणेश सावंत –
जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी मुलखासाठी मावळ्यांचं रक्त सांडत स्वराज्य उभा केलं. जिथं शाहू-फुले-आंबेडकरांनी माणसाला माणूस म्हणून पाहण्याचं धोण आखलं त्या माणसांना हक्क दिले, त्या महाराष्ट्रात जी लोकशाही फुलली त्या फुललेल्या लोकशाहीला आजच्या राजकारणातली पिढी नख लावतेय का? राज्याच्या स्थानिक स्वराज्य निवडणुका विविध पक्ष-संघटना लढतायत की गुंडांच्या टोळ्या? निवडणुकीत उभा राहणारे सर्वसामान्य की, गुंड? हा जो महापालिका निवडणुकीत तमाशा चालू आहे ना, त्या तमाश्याचे वगनाट्य लिहिणारे लेखक कोण? या प्रश्नाचं सरळ सरळ उत्तर भारतीय जनता पार्टी हे येतं. कारण ‘शत-प्रतिशत भाजप’ करण्याच्या इराद्याने राजकारणात उतरलेल्या भाजपाने राजकारणाचं, निवडणुकांचं अन् लोकशाहीचं ज्या पद्धतीने वस्त्रहण करून टाकलं त्यात
नागवं झालं ते निष्ठावाण
मुंबई महानगरीसह महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषीत झाला. सध्या वोटचोरी असो अथवा ईव्हीएम मशीनचा घोळ असो कुठल्याही निवडणुकीत भाजपा निवडून येते म्हणून निष्ठा अक्षरश: कापडात गुंडाळून खुंटीवर लटकवत विविध पक्षांचे लोक सत्तेसाठी भाजपाच्या दावणीला जातायत. भाजपाचा वाढता काफिला आणि निवडणुकीत ‘विजयी होणारा’ तो उमेदवार. कायटेरिया लावला जातो. म्हणून जिथं तिथं उमेदवार्या घोषीत होताच भाजपाच्या निष्ठावंतांनी आक्रोश केला. कोणी स्वत:चं तोंड बडवून घेतलं, कोणी पुढार्यांच्या गाड्या अडवल्या, कोणी आमदार-खासदार-मंत्र्यांसह जिल्हाध्यक्षांना शिव्या दिल्या, कुठे गचुरे धरले गेले, कुठे भाजपाच्या पदाधिकार्याला कोंडले गेले. हे सर्व चित्र गेल्या तीन दिवसात उभ्या महाराष्ट्राने पाहिलं. रडापडी दिसली, अश्रू गाळणे आणि झिंज्या उपटणे इथपर्यंत निष्ठावंतांचे हाल झाले. तिथेच भाजपाचे निष्ठावान शिव्या-शाप देऊ लागले.
ही नवी पद्धत भाजपाबरोबर अजितदादांची राष्ट्रवादी, शिंदेंची शिवसेना यांनी या निवडणुकीत राबवली. राजकारणात कुणी यावं, निवडणुकांमध्ये कुणी उभा राहावं, हा लोकशाहीने ज्याला त्याला पुर्ण अधिकार दिलाय. परंतु त्या लोकशाहीत गुंडांचं स्थान कुठं असावं, माफियांचं स्थान कुठं असावं, त्यांचे लागेबांधे कुणासोबत रहावेत, प्रतिष्ठीत पक्षांनी त्यांना तिकिट द्यावेत का? दिले तर त्याचे भविष्यात परिणाम काय होतील? याचा विचार आजच्या राजकारण्यांनी केलाय का? परंतु दहशत असो, की प्रेमाने जो निवडून येतो त्याला आम्ही तिकिट देतो, असे जे उत्तर आजच्या सत्ताकारणी नेतृत्वाकडून येतंय ते अत्यंत घातक. महाराष्ट्रातल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये ज्यांच्यावर खुनाचा गुन्हा, दरोडा, बलात्कार, मारामार्या यासारखे गुन्हे दाखल आहेत,नव्हे नव्हेत र जे गुंड-पुंड जेलमध्ये आहेत ते निवडणुकीला उभे आहेत, यातून आजचे राजकारणी निवडणुकात गुंडांना उभा करून सर्वसामान्यांना बंदुकीच्या आणि तलवारीच्या जोरावर नमवत त्या त्या शहरात सत्तास्थापन करू पहातायत का? पाच वर्षाच्या सत्ताकारणासाठी या महाराष्ट्रात विविध पक्ष हा महाराष्ट्र गुंडांच्या हाती देऊ पहातायत का? या प्रश्नाचं उत्तर जेव्हा आम्ही शोधायला गेलो तेव्हा सर्वोच्च पदाच्या व्यक्तीची
दादागिरी
आम्हाला पहायला मिळाली. विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी सरळ सरळ धमकी देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यातून उद्याची ही निवडणूक सत्ताधारी दाम आणि दंडांनी भरलेली आहे हे स्पष्टपणे दाखवून देत आहेत. एकतर आम्ही ज्या ठिकाणी निवडणुकीसाठी उभा राहतो त्या ठिकाणी दुसरे कोणीही उभा राहता कामा नये. या भूमिकेत ज्या पद्धतीने सत्ताधारी प्रशासकीय यंत्रणा राबवून घेत आहेत आणि त्या यंत्रणेच्या जोरावर निवडणुका लढवतायत त्यातून या निवडणुका लोकशाहीच्या अंगाने लढवल्या जातायत का? हा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो तेव्हा ‘गली गली में शोर है’ चा नारा देणारे आज खुद्द चोर है’ असे स्पष्टपणे पहायला मिळते. कधीकाळी काँग्रेसविरोधात आक्रमकपणे स्वत: सतीसावित्री नव्हे तर सत्यवान असल्याचे भासवून भाजप निवडणुका लढवत होतं मात्र आता ज्या पद्धतीने निवडणुका लढवल्या जातायत आणि त्या निवडणुकांमध्ये
बिनविरोधची पिपाणी
वाजवली जातेय ती लोकशाही खंबीर करणारी नक्कीच नाही. महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये राज्यभरात एक नव्हे दोन नव्हे तब्बल 70 नगरसेवक हे बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिंदेंच्या नगरसेवकांचा समावेश आहे. भाजपाचे 43 तर शिंदेंचे 21 नगरसेवक बिनविरोध आले. तेव्हा बिनविरोध येणं हे खरचं लोकशाहीचा सन्मान आहे की तेथील नागरिकांची अवहेलना ? निवडणूक आखाड्यामध्ये ज्या पद्धतीने भाजप आपले उमेदवार उतरवतो आणि विरोधी पक्षातील उमेदवारांसह अपक्षांची बोळवण साम-दाम-दंडातून करतो आणि स्वत:च्या उमेदवाराला विजयी गुलाल लावून उत्सव साजरा करतो, तसं करणं त्या त्या भागातील मतदारांवरचा अन्याय नव्हे का? होय, त्या वार्डातल्या प्रत्येक मतदारांना एकत्रित करून आमच्या वार्डाचा नेता अमूक अमूक आहे अशी बिनविरोधची निवडणूक प्रक्रिया राबविली तर ती नक्कीच लोकशाहीला उभारी देणारी. परंतु इथं निवडणुकीमध्ये जे काही लोक उभे राहतात ते बहुदा
‘रणछोडदास’
असतात. आता हे स्पष्ट झालय. कारण तिकिट घेण्यासाठी पळापळ करणारे, तिकिट मिळालं नाही म्हणून आक्रोश करणारे, रडारड करणारे, तोडफोड करणारे एकीकडे आपण पाहिले आणि दुसरीकडे ज्यांना तिकिट मिळाले त्यांनी ते तिकिट सोडा स्वत:ची अस्मिता विकली, पक्षाचा विश्वास गहाण ठेवला. कार्यकर्त्यांचा मान अक्षरश: धुळीस मिसळवला आणि त्या वार्डातून जे लोक संबंधित रणछोडदासकडे आपला नेता, आपलं नेतृत्व म्हणून पहात होता त्यांच्या स्वप्नांची अश्या रणछोडदासांनी राखरांगोळी केली. एकूणच आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये, पक्षांमध्ये ‘हमाम मे सब नंगे’ असल्याचे दिसते. साम-दाम-दंडाचा वापर ‘हम करे सो कायदा’ ही भूमिका सत्ता म्हणजेच सर्वस्व ही मानसिकता या महाराष्ट्राला प्रगतीच्या नव्हे अधोगतीच्या मार्गावर नेणारी. हे मात्र नक्की.














