गणेश सावंत
अन्याय आणि जुल्मी व्यवस्थेविरोधात आवाज उठवणार्यांना तेव्हा मावळे म्हटले जायचे, सैनिक म्हटले जायचे, क्रांतीकारी म्हटले जायचे. जनांचा आवाज म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. मुक्यांचा बुलंद आवाज म्हणून त्यांना ओळखलं जायचं, अन्यायाला वाचा फोडणारे अशा बिरुदावल्या त्यांच्या नावाअगोदर लावल्या जायच्या. आज माि त्याच तरुणांनी व्यवस्थेविरोधात आवाज उठवला, अन्यायाविरोधात न्याय मागितला, असत्याविरोधात सत्याची मागणी केली तर व्यवस्था एकतर त्यांच्या कपड्यावरून त्यांचा धर्म शोधते, नसता परजीवी म्हणून हिणवते, त्या हिणवणार्या व्यवस्थेविरोधात न्यायालयात धाव घेतली तर तिथेही तरुणांच्या पदरी अवहेलनाच येते. कारण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायधीशही जेव्हा अशा तरुणांना झुरळ म्हणतात, परजिवी म्हणतात, तेव्हा
जगावं की मरावं?
हाच प्रश्न या तरुणांच्या समोर उभा राहतो. या देशाच्या नव्हेतर दुनियेच्या उकरड्यावर खरट्या पत्तरवाडीवरच्या तुकड्यासारखं किती दिवस पडून राहायचं? शिक्षण घेतलं, आई-बापांनी कर्ज काढलं, स्वप्न पाहितली, परंतु शेवटी हातात काय आलं? बेरोजगारी, अपमान, आणि उपेक्षाच. रोज सकाळी उठायचं, जाहिराती पहायच्या, फॉर्म भरायचे, परीक्षा द्यायच्या, निकालाची वाट पहायची आणि शेवटी याचं उत्तर काय येतं, पेपर फुटला, भरती रद्द झाली, जागा विकल्या, मग सांगा, जगायचं तरी कशासाठी? हे आम्ही म्हणत नाहीत, व्यवस्थेच्या भोंगळ कारभाराचे वाभाडे या प्रश्नातून आजची तरुण नव्हे नव्हे तुमच्या मते आज ते झुरळ, कॉक्रोज. तुम्हाला विचारतायत आणि व्यवस्थेच्या या निर्ढावलेल्या वृत्तीला पाहून हेच तरुण म्हणतायत, कधी कधी वाटतं, देहाचं हे लक्तर त्या काळ्याकुट्ट डोहात, संपवून टाकावं, सगळं एका प्रहारात. कारण जिवंत राहूनही आम्ही रोज मरतोत. आत्मसन्मानाचा खकून होतोय, अभिमानावर बलात्कार होतोय, तरीही आम्ही खालच्या मानेने उभे राहतो त्यांच्या दाराशी ज्यांनी आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं.
विधात्याला आमचा प्रश्न
म्हणत ही तरुण पिढी विचारतेय, हे विधात्या इतका कठोर का झालास? ज्यांना आम्ही जन्म दिला, वाढवलं, तेच आम्हाला विसरतात आणि ज्यांनी आम्हाला जन्म दिला, तो देवही आता शांत बसला, मग या विस्कटलेल्या हाडांच्या सांगड्यांनी कुणाच्या पायावर डोकं आपटायचं? आम्ही श्रध्दा ठेवली होती या व्यवस्थेवर, विश्वास ठेवला होता संविधानावर आणि भरोसा होता तो न्यायावर परंतु आज त्याच व्यवस्थेच्या शिखरावर बसलेल्या सर्वोच्च न्यायाने आम्हाला झुरळ म्हटलं. आमचा आवाज त्यांना घाण वाटतोय, आमचे प्रश्न त्यांना त्रासदायक वाटतात. होय, लक्षात ठेवा राजे आणि सिंहासन फक्त सत्तेच्या जोरावर टिकत नाहीत, ते टिकते ते जनतेच्या श्रध्देवर आणि ज्या दिवशी तरुणातल्या मनातील श्रध्दा संपते त्यादिवशी कोणतीही सत्ता अक्षय राहत नाही. आम्हाला भिक नको, दया नको, आम्हाला फक्त एवढच हवय, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार, कष्टाचं मूल्य आणि स्वप्न पाहण्याची शिक्षा नव्हेतर संधी. आजच्या तरुण पिढीतल्या मनातली ही खदखद आहे. आम्हाला आश्चर्य वाटतं, निष्पक्ष असलेली न्यायव्यवस्था आणि त्यावर विराजमान झालेले न्यायाधीश जेव्हा आजच्या तरुण पिढीला झुरळ म्हणतात, तेव्हा या
व्यवस्थेची दिशा आणि दशा
काय ती असेल, गेल्या दशकभराच्या कालखंडापासून अखंड हिंदुस्तानात व्यवस्थेकडून जे जुमले वापरून स्वप्नांचा बाजार मांडला जातोय त्या स्वप्नाळू आणि खोटारड्या व्यवस्थेचे हस्तक न्यायासन होत असेल आणि बोलक्या माणसांना मुकं करण्याचा प्रयास होत असेल तर यापेक्षा लोकशाहीचे दुर्दैव ते कुठले? सरन्यायाधीश सूर्यकांत व न्यायमूर्ती जायमल्ल बागची यांच्या खंडपीठासमोर एका वकिलाचा ज्येष्ठ वकिलाचा दर्जा मिळवण्याच्या याचिककेवर सुनावणी झाली त्यामध्ये खंडपीठाने चांगलेच फटकारले. यात पिठाने ज्येष्ठता ही मागून मिळत नसते, तर ती निर्माण करावी लागते, असेही म्हटले. या त्यांच्या वक्तव्याबाबत आम्हाला काहीच म्हणायचे नाही, यथायोग्यच ते. परंतु यापुढे जात जेव्हा कोर्ट म्हणतं, बेरोजगार तरुण झुरळसारखे असतात, जे मिडिया, सोशल मिडिया किंवा आरटीआय कार्यकर्ते बनतात आणि व्यवस्थेवर हल्ले करतात, समाजात आधीच असे परजिवी आहेत जे व्यवस्थेवर हल्ला करतात, न्यायाधीश महोदयांच्या मते प्रश्न विचारणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, सत्याला-असत्य म्हणणे, अन्यायाविरुद्ध न्याय मागणे हा जर परजिवी अथवा झुरळ राहतात ते ठिकाण असेल तर मग
सत्यमेव जयते!
चा निनाद कुठे करायचा? ते कुठे लिहायचे? हा देश सहजासहजी उभा राहिलेला देश नाही. इथे क्रांतीकार्यांना बलिदान द्यावे लागले, निधड्या छात्यांवर गोळ्या झेलाव्या लागल्या, कित्येक भगिनींना आपला माथा पांढरा ठेवावा लागला. भगतसिंग, राजगुरूंसारख्या तरुणांचे तारुण या देशासाठी खर्ची पडले. आजच्या तरुणांचे हिरो तेच क्रांतीकारी आहेत. अहिंसेच्या माध्यमातून माणसाला माणूस म्हणून पाहण्याची शिकवण याच देशाने दिली. त्याच देशात निपजलेले, शिक्षण घेतलेले तरुण झुरळ कसे? ते सत्यमेव जयतेचा निनाद, त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा आवाज ते मिडिया, सोशल मिडिया अथवा आरटीआय अंतर्गत उठवत असतील, तर ते तरुण घाणीच्या साम्राज्यात राहतायत, असं म्हणायचं का? त्यांच्या मुखातून निघणारा सत्यमेव जयतेचा नारा हाही त्याच साम्राज्याचा धनी म्हणायचा का? एकीकडे शासन-प्रशासन व्यवस्था तरुणांना नागवते आणि न्यायव्यवस्था त्याच तरुणांना परजिवी आणि झुरळ म्हणते, तेव्हा हा तोच हिंदूस्तान आहे का? जो न्यायासाठी जगाच्या पाठीवर चर्चीला जायचा. आज खरंतर न्यायव्यवस्थेने शासन-प्रशासन व्यवस्थेकडे
कटाक्ष
टाकायला हवे. 2014 पासून 2026 पर्यंत केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधार्यांनी बेरोजगार तरुणांच्या हाती काम देऊ, अशा कित्येक वल्गना केल्या, कधी विश्वगुरू तर कधी या देशाला मॉडेल बनवू, असे कित्येक आश्वासने दिले. पेट्रोल कम हुवा की नाही? या नार्यांनीही आस्मंत दुमदुमून गेले, मात्र प्रत्यक्षात देशाची आजची परिस्थिती काय? सत्तेत बसलेले लोक व्यासपीठावरून माध्यमांमधून, सोशल मिडियांमधून ज्या गोष्टी पेरतात, जे दावे करतात, त्या गोष्टी या देशात आहेत का? खोटारड्या पणाची परिसीमा सत्ताधीशांनी गाठली. कधीतरी न्यायव्यवस्थेने त्या घाणेरड्या वृत्तीवर व्यक्त झाले असते तर ते अधिक बरे झाले असते. आज देश ज्या दिशेने जातोय, ती वाट नुसती काटेरी नाही, तर अत्यंत तप्त तीही संतापाच्या लाव्हा रसात ती वाट न्यायाने, समतेने, तरुणांच्या महत्वाकांक्षेने न्यायव्यवस्थेने मोकळी केली तर अधिक बरे होईल. वर्ण अभिमाने विटाळशी झाली। न कळे हे झाले मती त्याची ॥ उच्चवर्णीय असल्याचा अहंकार बाळगणारे स्वत:ला शुद्ध आणि इतरांना विटाळी मानतात ही त्यांची बौद्धीक दिवाळखोरी आहे, असे जगद्गुरू तुकोबारायांनी म्हटले होते आणि आताही व्यवस्थेची सर्वस्तरातून बौद्धीक दिवाळखोरी देश नव्हे जग पाहतोय.










