घटनास्थळाचा पोलीस पंचनामा, श्वानपथकही दाखल
केज (रिपोर्टर): शेतातील घराला कडी लावून शेजारच्या शेतामध्ये फवारणीसाठी गेलेल्या शेतकर्याच्या घरामध्ये घुसून अज्ञात चोरट्यांनी घरामधील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह नगदी रोखरक्कम चोरून नेल्याची घटना केज तालुक्यातील पालसिंघण येथे काल दुपारी साडेचार ते पाचच्या सुमारास घडली. तब्बल आठ ते दहा लाखांच्या आसपास चोरट्यांनी ऐवज लंपास केला. या घटनेची माहिती नांदूर पोलीस चौकीला झाल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी दाखल होत पंचनामा केला. रात्री उशिरा श्वनपथकाला पाचारण करण्यात आले होते.
केज तालुक्यातील पालसिंघण येथील अमोल जगताप हे शेतामध्ये राहतात. काल सकाळी ते शेजारच्या शेतामध्ये फवारणी करत होते तेव्हा रोजच्या प्रमाणे त्यांच्या घरच्यांनी घराला कडी लावलेली होती. मात्र फवारणीचे औषध संपल्यामुळे जगताप कुटुंबातील एक महिला घराकडे आली तेव्हा घर उघडे दिसले. त्याचबरोबर सोन्याच्या दागिन्याचा डब्बा दारात पडलेला दिसला. आतमध्ये गेल्यानंतर उघडलेली कपाटे आणि त्यातील कपडे अस्ताव्यस्त पाहिल्यानंतर घरामध्ये चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी अमोल जगताप यांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यांनी तात्काळ केज पोलीस ठाण्याअंतर्गत येणार्या नांदूर पोलीस चौकीशी संपर्क साधला. पोलीसही घटनास्थळी तात्काळ डेरेदाखल झाले. पंचनामा केला. रात्री उशिरा घटनास्थळी श्वानपथक दाखल झाले. श्वानाने रस्त्यालगत शंभर फुटापर्यंत माग दाखवला. घरामधून चोरट्यांनी दहा तोळे सोने आणि रोख रक्कम लंपास केली. या प्रकरणी केज पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पालसिंघण परिसरातील शेतात ही जबरी चोरी झाल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.













