बीड / नांदेड :
बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीवर सातत्याने टीका होत असली, तरी पुणे शहरातील गुन्हेगारी बीडपेक्षा अधिक गंभीर असल्याचे वास्तव आहे. असे असतानाही बीडप्रकरणात वेगळा आणि पुण्यात वेगळा न्याय का लावला जातो, असा सवाल नांदेड येथील सामाजिक कार्यकर्त्या फरहिन फराद यांनी उपस्थित केला आहे.
बीडचे पालकमंत्री असलेले आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत फराद म्हणाल्या की, “एखाद्याने खून केला म्हणून त्याची पत्नी, आई-वडील किंवा संपूर्ण कुटुंब खूनी ठरत नाही,” असे विधान अजित पवार यांनी केले होते. मात्र हाच न्याय बीडमध्ये का लावला गेला नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
बीडमध्ये मुंडे यांच्या कार्यकर्त्याच्या कार्यकर्त्याने गुन्हा केला , हा वेगळा तपासाचा विषय आहे. मात्र त्या घटनेचा संपूर्ण राजकीय दबाव मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टाकून त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेण्यात आला. त्या खूनप्रकरणाशी धनंजय मुंडे यांचा कोणताही थेट संबंध नसताना त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, हा अन्याय असल्याचा आरोप फराद यांनी केला.
पुढे बोलताना त्यांनी पुण्यातील राजकीय स्थितीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पुण्यातील अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या, तुरुंगवास भोगून आलेल्या कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी दिली जात असल्याचे सांगत, “हे गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारे नाही का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. बीडमध्ये मात्र अशी परिस्थिती नव्हती, असेही त्यांनी नमूद केले.
धनंजय मुंडे हे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे राजकीय वारसदार असून, आजपर्यंत त्यांच्यावर कोणताही थेट गुन्हेगारी आरोप सिद्ध झालेला नाही. ते कधीही तुरुंगात गेलेले नाहीत. केवळ कार्यकर्त्याच्या कार्यकर्त्याने गुन्हा केल्याच्या आरोपावरून मंत्रीपद काढणे हा अन्याय असल्याचे फराद यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून न्यायाची अपेक्षा होती, मात्र त्यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही फराद यांनी केला. “एकाच राज्यात एक ठिकाणी एक न्याय आणि दुसऱ्या ठिकाणी वेगळा न्याय असे होऊ नये,” असे त्या म्हणाल्या.
धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद काढल्याने ओबीसी समाजात नाराजी असल्याचा दावा करत, “ओबीसी समाज सध्या शांतपणे हा अन्याय सहन करत आहे,” असे त्यांनी सांगितले. अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करून धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रीपद द्यावे, अशी मागणी फरहिन फराद यांनी केली.









