बीड : पोस्टे बीड ग्रामीण गुन्हा रजिस्टर नंबर २०७/२०२५, कलम १३७(२) भा.न्या.सं. अन्वये दाखल गुन्ह्याचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे (AHTU) वर्ग होताच अवघ्या २४ तासांत अल्पवयीन पीडित मुलीचा शोध घेऊन आरोपीला ताब्यात घेण्यात AHTU बीडला यश आले आहे.
सदर गुन्हा दिनांक १५/०१/२०२६ रोजी दुपारी AHTU कडे वर्ग झाला होता. तपासाची सूत्रे स्वीकारताच पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांनी मूळ फाईलचे अवलोकन करून फिर्यादी व साक्षीदारांची भेट घेत सखोल चौकशी केली. मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करताना पीडित मुलगी व आरोपी हे बुलढाणा जिल्ह्यात वास्तव्य करत असल्याची माहिती समोर आली.
त्यानुसार मा. पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने रात्री ०९:०० वाजता AHTU ची टीम बुलढाणा जिल्ह्याकडे रवाना झाली. दिनांक १६/०१/२०२६ रोजी पहाटे ०३:०० वाजता मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार टीमने सोनाळा, ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा येथे छापा टाकून पीडित मुलगी व आरोपी यांना त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. पोस्टे सोनाळा येथे आवश्यक नोंद करून त्यांना बीड येथे आणण्यात आले.
सकाळी ०९:०० वाजता AHTU टीम बीड येथे दाखल झाली. पीडित मुलीला विश्वासात घेऊन तिचे समुपदेशन करण्यात आले तसेच तिची तिच्या आई-वडिलांशी भेट घालून देण्यात आली. त्यानंतर पीडित मुलगी व आरोपी यांना पुढील तपासकामी पोस्टे बीड ग्रामीण येथे हजर करण्यात आले.
ही संपूर्ण कार्यवाही पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली PSI पल्लवी जाधव, पोलीस हवालदार उषा चौरे, हेमा वाघमारे, पोशी योगेश निर्धार, गजानन चौधरी तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, बीडच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.









