पार्थ, जय ने दिला मुखाग्नी, अजित दादांचा झांजवात बारामतीच्या मातीत विसावला
बारामती रिपोर्टर
राज्याच्या राजकारणात गेल्या साडेचार दशकांपासून झंझावात निर्माण करणारे, आपल्या रोखठोक आणि निर्भीड शैलीने मित्र-शत्रूंनाही थक्क करणारे, ‘कामाचा माणूस’ म्हणून अखेरच्या श्वासापर्यंत ओळख जपणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आज (२९ जानेवारी) बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला.ग्रामीण महाराष्ट्राशी अतूट नाळ जपणारे, राजकारणाला केवळ सत्तेचे नव्हे तर सेवाभावाचे माध्यम मानणारे अजितदादा आज निपचित पडले आहेत, ही जाणीव अनेकांच्या काळजाचा ठाव घेत होती. त्यामुळे बारामतीसह संपूर्ण राज्यात सन्नाटा पसरला होता.अजित पवार यांच्या पार्थिवाला चिरंजीव पार्थ पवार आणि जय पवार यांनी मुखाग्नी दिला. यावेळी विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात जमलेल्या हजारो समर्थकांच्या डोळ्यांत अश्रू तर ओठांवर “अजितदादा अमर रहे”चा गजर होता. महिलांसह कार्यकर्त्यांनी केलेला आक्रोश हा अजितदादांवर असलेल्या अपार प्रेमाची आणि नात्याची साक्ष देणारा होता.
नेहमी खडसावणरे, प्रसंगी कठोर निर्णय घेणारे, पण संकटात सापडलेल्या सर्वसामान्यांसाठी मदतीला धावून जाणारे दादा आज कायमचे शांत झाले आहेत, ही जाणीव अनेकांसाठी असह्य ठरत होती. त्यामुळे अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.
विद्या प्रतिष्ठानमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात विशेष चबुतरा उभारण्यात आला होता. या ठिकाणी पवार कुटुंबीयांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अजित पवार यांचे पार्थिव सकाळी मुळगावी काटेवाडी येथे अत्यंदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. अनेकांना अश्रू अनावर झाले होते. अभूतपूर्व गर्दीमुळे पोलिसांनाही जमाव नियंत्रणात ठेवणे अवघड झाले होते. आमदार रोहित पवार यांनी केलेल्या विनंतीनंतर परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात आली.
मुळगावी श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर अजित पवार यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानमध्ये आणण्यात आले. यावेळी पत्नी खासदार सुनेत्रा पवार, भगिनी तसेच सुना यांनी अंत्यदर्शन घेतले. हा क्षण अत्यंत भावनिक ठरला.
देशभरातून राजकीय दिग्गज बारामतीत दाखल
अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी देशभरातून राजकीय नेत्यांनी बारामतीकडे धाव घेतली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष नितीन नबिन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, छगन भुजबळ, प्रफुल पटेल, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, जयंत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे,पंकजा मुंडे, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, अमोल कोल्हे, रितेश देशमुख यांच्यासह विविध पक्षांतील नेते, खासदार, आमदार, मंत्री आणि मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
राजकीय पलीकडे जाऊन माणूस म्हणून दिला आदर
राजकीय मतभेद विसरून सर्व पक्षांतील नेत्यांनी अजित पवार यांच्या कार्याची, निर्णयक्षमता आणि प्रशासकीय पकडीची मुक्तकंठाने प्रशंसा केली. “मतभेद असतील, पण अजितदादांच्या कामावर कधीच प्रश्नचिन्ह नव्हते,” अशा भावना अनेक नेत्यांनी व्यक्त केल्या.
आज बारामतीने केवळ एक राजकीय नेता नाही, तर ग्रामीण महाराष्ट्राचा एक खंबीर आवाज, संकटात धावून जाणारा एक आधार आणि कामातून आपली ओळख निर्माण करणारा नेता गमावला आहे.









