मुंबई : ऑनलाईन रिपोर्टर
मागील काही दिवसांपासून मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदावर कोणाची वर्णी लागणार, हे पद भाजपकडे जाणार की शिवसेनेला मिळणार, याबाबत जोरदार चर्चा सुरू होती. अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून मुंबई मनपाच्या महापौरपदी भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.
तर उपमहापौरपदासाठी शिंदे गटाच्या शिवसेनेकडून प्रभाग क्रमांक ४ चे नगरसेवक संजय घाडी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. राहुल शेवाळे यांनी संजय घाडी यांच्या नावाची घोषणा केली. उपमहापौरपदाचा कालावधी सव्वा वर्षांचा असेल.
नवनिर्वाचित महापौर रितू तावडे या प्रभाग क्रमांक १३२ मधील नगरसेविका असून त्या दोन वेळा निवडून आल्या आहेत. त्यांनी याआधी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचं अध्यक्षपद भूषवलं आहे. तसेच स्थापत्य समितीच्या उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.
ईशान्य मुंबईतील आक्रमक चेहरा म्हणून रितू तावडे यांची ओळख आहे. वीज दरवाढीविरोधात त्यांनी यापूर्वी तीव्र आंदोलन करत जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली होती. त्यांच्या अनुभवाचा फायदा मुंबई महापालिकेच्या कारभाराला होईल, असा विश्वास भाजपकडून व्यक्त करण्यात आला आहे.
महापौरपद भाजपकडे तर उपमहापौरपद शिवसेनेकडे गेल्याने महापालिकेतील सत्तासंतुलन स्पष्ट झालं असून, आगामी काळात विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.













