बीड (रिपोर्टर): मराठवाड्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून शेतकरी अतामहत्या होत आहेत. गेल्यावर्षी 1 हजार 129 शेतकर्यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले होते. या नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात 76 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. यामध्ये सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या असून जिल्ह्यातील 24 शेतकर्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.
राज्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भात सर्वाधिक शेतकर्यांच्या आत्महत्या झाल्या. नापिकी, अतिरिक्त पाऊस, शेतमालाला भाव नसणे, कर्जबाजारीपणाला कंटाळून यासह इतर कारणांवरून शेतकरी आत्महत्या वाढल्या. या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून कुठल्याही ठोस उपाययोजना आखल्या जात नाहीत. गेल्या वर्षी मराठवाड्यात 1129 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या होत्या. या नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यातही आत्महत्या मोठ्याप्रमाणात झाल्या. मराठवाड्यात 76 शेतकर्यांनी जानेवारी महिन्यात आपले जीवन संपवले आहे. यात सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यात असून जिल्ह्यातील 24 शेतकर्यांनी मरणाला कवटाळले आहे. मराठवाड्यातील आत्महत्यांबाबत केंद्र आणि राज्य सरकारने दखल घेणे गरजेचे आहे. मराठवाड्यात सिंचनाचे क्षेत्र कमी आहे. त्यातच उद्योग देखील कमी असल्यामुळे शेतकर्यांना शेतीवर अवलंबून रहावे लागले आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या आत्महत्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रभावी आणि कायमस्वरुपी उपाययोजना आखणे ही काळाची गरज आहे.









