लिंबागणेश (रिपोर्टर): बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील डॉ. भारत मेंगडे व डॉ. प्रतिभा मेंगडे हे दांपत्य रविवारी सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास बोरखेड येथील शेताकडे निघाले असताना त्यांच्या व्हिस्टा इंडीका कारमधून अचानक धूर निघू लागला. महाजनवाडी फाट्याजवळ ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ वाहन थांबवून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
क्षणातच कारने पेट घेतला. वायर शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. डॉ. भारत मेंगडे यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आणि दोघेही सुरक्षित बाहेर पडले. घटनेची माहिती मिळताच डॉ. गणेश ढवळे, विक्रांत वाणी, सय्यद अख्तर, सुमित मुळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच महाजनवाडीचे सरपंच विश्वंभर गिरी यांच्यासह शिवाजी घरत, सतीश घरत, ऋषिकेश घरत, अभिषेक घरत व अक्षय घरत यांनी तत्परतेने मदत करत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.









