परळी (रिपोर्टर): परळीच्या ओपळे मैदानावर पशूसंपदेच्या महाकुंभात आज प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी देशभरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली असून राज्यासह देशाच्या कानाकोपर्यातून आलेल्या दुर्मिळ मौल्यवान आणि उच्च क्षमतेच्या पशुधनाने नागरिकांच्या डोळ्याचे पारणे फेडले आहेत. पशू-पक्ष्यांच्या या अनोख्या विश्वात गेल्या तीन दिवसात अनेक जण हरपून गेले आहेत. बारामतीचा प्रसिद्ध हिंद केसरी सोन्या बैलाची पन्नास लाख रुपये किंमत आहे. तो या प्रदर्शनाची शान ठरला आहे. 45 लिटर दूध देणारी जर्सी त्याचबरोबर सेलिब्रेटी घोडे नेदरलँडच्या सानेल जातीचा पांढराशुभ्र बकरा यासह अन्य पशू-पक्ष्यांनी अधिक लक्ष वेधले.
महाराष्ट्र शासनाच्या पशूसंवर्धन विभागातर्फे आयोजीत महा पशूधन एक्सपो 2026 हा परळीतील ओपळे मैदानावर भरवण्यात आला. पशूसंवर्धनाचा महाकुंभ परळीत भरल्या गेल्याचे गेल्या तीन दिवस दृष्टीक्षेपात पडले. राज्यासह देशातील कानाकोपर्यातून अत्यंत दुर्मिळ मौल्यवान आणि उच्च क्षमतेचे पशूधन या प्रदर्शनात आले आहे. आधूनिक तंत्रज्ञान, पशूखाद्य आणि पैदासीच्या नव्या खाद्याची माहिती इथे शेतकर्यांना मिळत आहे. 75 लाखांची वर्ल्ड रेकॉर्ड असलेली म्हैस प्रदर्शनातले एक आश्चर्य ठरले आहे. मान तालुक्यातल्या त्रिंबक बोराटे यांच्याकडे जगातील सर्वात बुटकी म्हैस (2 फुट 8 इंच) हिची किंमत 75 लाख एवढी आहे. तिला पाहून प्रत्येक जण थक्क होत आहे तर बारामतीचा प्रसिद्ध हिंद केसरी सोन्या बैल हा 50 लाख रुपये किंमतीचा आहे.
दुग्धव्यवसायातील प्रगतीचे प्रदर्शन घडवताना 45 लिटर दूध देणारी जर्सी गाय या प्रदर्शनात दाखल आहे. 35 पेक्षा अधिक उच्च दर्जाच्या गाईसह मुरा जातीची दररोज 15 लिटर दूध देणारी म्हैस शेतकर्यांचे आकर्षण ठरत आहे. सेलिब्रेटी घोडे, परदेशी पाहुणे, पंजाबचा प्रसिद्ध फतेह हा रत्नाकर वंशाचा घोडा राजेशाही देहसृष्टीमुळे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. काश्मिरी फायटर बकरा, रिंगमधून उड्या मारणारे प्रशिक्षीत श्वान, तरुणांना आकर्षित करत आहे.













