धाराशिव : ऑनलाईन रिपोर्टर
धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील चोराखळी येथे पहाटेच्या सुमारास सशस्त्र दरोड्याची थरारक घटना घडली असून सहा जणांच्या टोळीने घरात घुसून पिस्तूल व लोखंडी सुरा दाखवत तब्बल ९ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोराखळी (ता. कळंब) येथील रहिवासी तथा कालिका सांस्कृतिक लोकनाट्य कलाकेंद्राच्या संचालिका निर्मला मोहन जाधव (वय ४५) या धाराशिव साखर कारखान्याजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ लगत असलेल्या त्यांच्या कलाकेंद्राच्या दुसऱ्या मजल्यावर कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांच्यासोबत रेखा किशोर शिंदे (रा. टाकळी, जि. परभणी) व शिवम उर्फ गळ्या गंगावणे हेही राहत होते.
तक्रारीनुसार, मागील काही महिन्यांपासून तेरखेडा येथील सचिन उर्फ प्रशांत बापू पवार व महादेव विठ्ठल घुले यांची कलाकेंद्रावर ये-जा होती. आर्थिक व्यवहारातून वाद निर्माण झाल्यानंतर सचिन पवार याने घरफोडीची धमकी दिल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर चोराखळीतील कलाकेंद्र सील झाल्याने निर्मला जाधव यांनी बार्शी (जि. सोलापूर) येथे भाड्याने दुसरे कलाकेंद्र सुरू केले होते. रविवारी (ता. २) पहाटे साडेतीनच्या सुमारास बार्शी येथील कलाकेंद्र बंद करून निर्मला जाधव, रेखा शिंदे, शिवम गंगावणे व चालक शशिकांत मुंडे हे इनोव्हा कारने चोराखळी येथे परतत असताना एका चारचाकी वाहनाने त्यांचा पाठलाग केल्याचे जाणवले.
पहाटे साडेपाचच्या सुमारास घराचे दार उघडे असताना तोंडाला कापड बांधलेल्या सहा जणांनी घरात घुसखोरी केली. आरोपींपैकी दोघांनी शिवम गंगावणे याला जमिनीवर दाबून धरले, एकाने निर्मला जाधव यांच्या डोक्याला पिस्तूल लावले तर दुसऱ्याने रेखा शिंदे यांच्या गळ्याला लोखंडी सुरा लावून धमकावले. आरडाओरड केल्यानंतर आरोपींनी तिघांच्या डोळ्यांत चटणी टाकून जीवे मारण्याची धमकी दिली.
यानंतर आरोपींनी निर्मला जाधव यांच्या अंगावरील सुमारे १२१.६०० ग्रॅम वजनाचे अंदाजे ६ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, चार मोबाईल फोन (किंमत सुमारे ३ लाख ४९ हजार रुपये) तसेच सीसीटीव्ही डीव्हीआर असा एकूण ९ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
दरोड्यावेळी समोर उभा असलेला एक आरोपी सचिन उर्फ प्रशांत पवार असल्याचे ओळखूनही जीवाला धोका असल्याने तात्काळ ओळख उघड केली नसल्याचे तक्रारीत नमूद आहे. या दरोड्यात सचिन पवारसह पाच अज्ञात आरोपी तसेच महादेव घुले यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तात्या भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.








