बीड (रिपोर्टर): गावागावातले प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि राज्य शासनाच्या योजना थेट लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी सरकारने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ मंडळ स्तरावर घेण्याचे योजिले आहे. गावातल्या सरपंचांनी कुठलाही पक्षीय भेदाभेद न ठेवता आपल्या गावातल्या प्रत्येक अडचणी त्याचबरोबर सत्ताधारी-विरोधक असलेल्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी या शिबिराचा उपयोग करून घ्यावा, जर कुठे सर्वसामान्य नागरिकांना अडचणी येत असतील तर त्यांनी थेट जिल्हाधिकार्यांशी अथवा माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर विभागाचे आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले.
ते आज बीड तालुक्यातील तळेगाव या ठिकाणी आयोजीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात अध्यक्ष म्हणून बोलत होते. या वेळी जिलहाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहेमान, अप्पर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना आयुक्त जितेंद्र पापळकर म्हणाले, राज्य शासनाने सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि राज्य शासनाच्या समाजोपयोगी योजना सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचविण्यासाठी या शिबिराचे आयोजन केले आहे. शेतकर्यांचा सर्वात मोठा प्रश्न हा पेरणीच्या वेळेस सुरू होतो. बांधावरचे रस्ते, पायवाट यातून भांडणतंटे-वादविवाद सातत्याने दिसून येतात. अशा वेळी राज्य सरकारने शेत पांदणरस्ते सुरू केले आहेत. ते 30 मेपर्यंत पूर्ण करावेत, हे सांगतानाच आयुक्त म्हणाले, जिल्हा प्रशासनानेही गावागावातील प्रश्न तलाठी, सरपंच, प्रतिष्ठीत नागरीक यांच्या सोबत सल्लामसलत करून तेही मार्गी लावावेत, त्याचबरोबर गावातल्या कुठल्याही व्यक्तीला शासनाच्या योजनेबाबत अथवा अन्य प्रश्नांबाबत थेट जिल्हाधिकारी कार्यालय, अथवा आयुक्त कार्यालयापर्यंत येता येऊ नये, ते प्रश्न तिथले तिथेच सोडवले जावेत यासाठीच या शिबिराचे आयोजन मंडळ स्तरावरील गावांमध्ये केले जात आहे. या शिबिरात संजय गांधी, वारसा हक्काचे फेरफार, जिवंत सातबारा इथपासून आयुष्मान आरोग्य योजना यासह अन्य छोट्यातल्या छोट्या प्रश्नांची सोडवणूक होणार आहे. हे शिबीर आयोजीत करताना आठवडाभरापूर्वी मंडळातील जे काही गावे शिबिराला उपस्थित राहणार आहेत त्या गावच्या सरपंचाने प्रामुख्याने गावातले राजकारण बाजुला ठेवत वस्तूनिष्ठ सर्वसामान्यांचे जे काही प्रश्न असतील, जया काही अडचणी असतील त्या शिबिरात मांडाव्यात. गावकर्यांनीही या शिबिरात तेवढ्याच मोठ्या प्रमाणाने सहभाग नोंदवत आपल्या हक्काच्या योजना आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील रहात आपले प्रश्न या शिबिराच्या माध्यमातून शासन आणि प्रशासन स्तरावर मांडावेत, जर तहसील अथवा जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी हे प्रश्न सोडवत नसतील तर थेट जिल्हाधिकार्यांशी अथवा माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. या शिबिरात प्र्रातिनिधीक स्वरुपात जातीचे प्रमाणपत्र, आयुष्मान आरोग्य कार्ड योजना, गरोदर मातांना आरोग्य किट आदी योजनांतर्गत लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. या वेळी तळेगावच्या सरपंचासह इतर गावचे सपंचही उपस्थित होते. तहसीलदार चंद्रकांत शेळके, नायब तहसीलदार सुहास हजारे यांच्यासह सर्व खातेप्रमुखांची उपस्थिती होती.








