गेवराई (रिपोर्टर): तालुक्यातील गढी येथील जयभवानी सहकारी साखर कारखाना परिसरातील साखर गोडाऊनमध्ये झालेल्या चोरीचा गेवराई पोलिसांनी अवघ्या सहा तासांत छडा लावत दोन आरोपींना अटक करून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोडाऊन किपर गोपाळ कल्याण शिंदे (वय ४८, रा. खांडवी, ता. गेवराई) यांनी पोलीस स्टेशन गेवराई येथे फिर्याद दिली. दिनांक २२ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास कारखान्यात जेसीबी ऑपरेटर म्हणून काम करणारा शुभम शिरसट व सुरक्षा रक्षक सोमनाथ सुरवसे (दोघे रा. गढी, ता. गेवराई) यांनी संगनमत करून गोडाऊनचे शटर उचकवून आत प्रवेश केला. त्यानंतर गोडाऊनमधील ३८ साखरेच्या गोण्या (प्रति गोणी १,८३० रुपये) असा एकूण ६९,५४० रुपयांचा माल चोरी करून मालवाहू वाहनातून बाहेर नेला.
तक्रारीवरून गुन्हा दाखल करत पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. आरोपींना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. चोरी केलेल्या साखरेच्या गोण्या गढी येथे विक्री केल्याचेही निष्पन्न झाले. तपासादरम्यान पोलिसांनी ६९,५४० रुपयांच्या साखरेच्या गोण्या तसेच चोरीसाठी वापरलेले सुमारे ८ लाख रुपये किमतीचे मालवाहू पिकअप वाहन असा एकूण ८,६९,५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी अवघ्या सहा तासांत गुन्ह्याचा छडा लावून ही कारवाई केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके व पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि लंके, सपोनि जंजाळ, पोउपनि ऊदगिरकर, पोउपनि खोत, ग्रे. पोउपनि पारधी, पोलीस अंमलदार सांगळे व होमगार्ड पाटोळे यांच्या पथकाने पार पाडली.









