बीड : ऑनलाईन रिपोर्टर
आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल व डिझेल उपलब्धतेबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर काही नागरिक इंधनाचा साठा करण्याच्या उद्देशाने कॅन, बाटल्या व इतर भांड्यांमध्ये पेट्रोल-डिझेल भरून घेत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. ही बाब सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याने जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी शिवकुमार स्वामी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, बीड जिल्ह्यात कोणत्याही पेट्रोल पंपावरून ग्राहकांना पेट्रोल किंवा डिझेल खुल्या स्वरूपात म्हणजेच बाटली, कॅन किंवा इतर भांड्यांमध्ये देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
पेट्रोल पंप चालकांनी या आदेशाचे काटेकोर पालन करावे, अन्यथा शासन नियमांनुसार संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अनावश्यक साठेबाजी टाळावी व सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा विभागाने केले आहे.









