गेवराई : आर्थिक फायद्याच्या उद्देशाने स्वतःच्या शेतात गांजाची लागवड करणाऱ्या एका इसमावर गेवराई पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल ५.८०० किलो गांजाची झाडे जप्त केली आहेत. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे १ लाख ७४ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिले होते. त्यानुसार गेवराई पोलीस स्टेशनच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सुशी (वडगाव) ता. गेवराई येथील भाऊसाहेब तात्याबा तुरुकमारे (वय ६०) यांनी गट नंबर २३४ मधील स्वतःच्या शेतात ज्वारीच्या पिकामध्ये गांजाची लागवड केली आहे.
मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गेवराई पोलिसांचे पथक कृषी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसह संबंधित शेतात दाखल झाले. पाहणीदरम्यान ज्वारीच्या पिकामध्ये लपवून ठेवलेली गांजाची ४२ झाडे आढळून आली. पोलिसांनी ती झाडे जप्त करून आरोपीस ताब्यात घेतले.
या कारवाईत आरोपीच्या ताब्यातून ५.८०० किलो गांजाची झाडे, अंदाजे किंमत १,७४,००० रुपये, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर व उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पवार, सपोनि लंके, सपोनि जंजाळ, पोउपनि नागरे तसेच पोलीस अंमलदार देवडे, भिसे, शिंदे, सोनवणे, सांगळे, ओव्हाळ, डोके, फॉरेन्सिक पथक तसेच कृषी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पार पाडली.









