हिंगोली/परभणी/नांदेड (रिपोर्टर): मराठवाड्यातील हिंगोली, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांना आज, शनिवारी (दि. 11) सकाळी 8:45 ते 8:46 च्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. हा धक्का 4.7 रिश्टर स्केल असल्याची माहिती आहे. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली शहर, वसमत, औंढा आणि कळमनुरी तालुक्यात धक्के बसताच नागरिक घराबाहेर पडले. त्यानंतर लगेचच परभणी शहर व जिल्ह्याच्या काही भागांत आणि नांदेड जिल्ह्यातही जमिनीला कंप जाणवल्याने काही काळ घबराट पसरली होती.
एकाच वेळी तीन जिल्ह्यांत कंप
हिंगोली जिल्ह्याला 8:45 वाजता पहिला धक्का बसला, तर त्याच्या एका मिनिटानंतर म्हणजेच 8:46 वाजता परभणी आणि नांदेड जिल्ह्यालाही भूकंपाची जाणीव झाली. सकाळी कामाच्या गडबडीत असतानाच अचानक खिडक्या आणि घरातील भांडी वाजू लागल्याने नागरिकांना भूकंपाची खात्री पटली. विशेषतः वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे भागात गेल्या अनेक दिवसांपासून हे सत्र सुरू असल्याने ग्रामीण भागात मोठी दहशत पाहायला मिळत आहे.
जीवितहानी नाही, प्रशासन सतर्क
प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता सौम्य असल्याने कुठेही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची नोंद नाही. मात्र, वारंवार बसणार्या या धक्क्यांमुळे घरांना तडे जाण्याची भीती व्यक्त होत आहे. हिंगोली, परभणी आणि नांदेडचे जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.








