सांय दैनिक बीड रिपोर्टर मधील आज दिनांक 26 जून रोजीचे कटाक्ष
गणेश सावंत/9422742810
बघा, जे करणार ते भोगणार ‘इज्जत देतो न भई कशाला? जरा माझं हे बघू नका, तुम्ही अती करताय, भाई बस्स ना, बंद कर ना आता, बंद कर नाही तर मी विसरून जाईल, मी खासदार आहे, इज्जत करतोय, इज्जत करा तुम्ही उगाच माझ्या ढुंगणात बोट घालता. चाल रेकॉर्ड कर, उगाच डोक्यात जाऊ नका, रोज तुम्हाला जेवायला देतोय, आता मनात आलं तर मारून पाठवणार तुम्हाला. काय लिहायचं तर लिहा, जा त्या कमिश्नरकडे तक्रार करा, दोन तीन शिव्या, येऊ नका माझ्याकडे, आला तर मारणार आता, रेकॉर्ड करा, आणि सांगा, कोणी माझ्याकडे आलं तर मी मारणार, हे लिहून घे रेकॉर्ड कर, पोलिसांसमोर सांगतोय,’ या धमक्या कुठल्या गल्लीच्या गुंडाने, दरोडेखोराने, माफियाने अथवा दहशतवाद्याने दिल्या नाहीत. या धमक्या दिल्यात त्या खासदार संजय दिना पाटील यांनी. त्याही पत्रकारांना. हे एकमेव खासदार धमक्या देणारे अथवा माराकुटी करणारे नाहीत. केंद्र आणि राज्यातले आमदारही तसेच मारकुटे अन् गुंडांगत वागणारे याआधीही दिसून आले. जर इथे आमदार-खासदारच गुंडांची आणि माफियांची भाषा बोलत असतील तर वाडी-वस्ती-तांड्यांसह शहरातल्या नाक्या-नाक्यावर त्यांना फॉलो करणारी आजची तरुणाई काय करत असेल? यात त्या गावाची त्या शहराची, त्या जिल्ह्याची अन् त्या राज्याची कायदा व सुव्यवस्था कशी असेल ? संजय दिना पाटील या खासदाराने ज्या पद्धतीने पत्रकारांना भाषा वापरली ही हिम्मत नाही तर सत्तेचा तो माज असावा. पत्रकारांना एवढ्या हिन दर्जाने जी वागणूक दिली जाते त्याला
पत्रकार जबाबदार
पत्रकारितेला लोकशाहीतला चौथा आधारस्तंभ मानला जातो. मात्र 2014 च्या नंतर या देशात ज्या पद्धतीने सरकार ‘हम करे सो..’ च्या भूमिकेत वर्तन करत आहे त्या भूमिकेला साद सातत्याने बाजारू पत्रकारितेने घातली आहे. मास्टरस्ट्रोक पासून ज्या बिरुदावली सरकारच्या त्या नाकर्त्या नुमाईंद्यांबद्दल वापरल्या ते नुमाईंदे राजकारण-समाजकारण सोडून आता थेट गुंडांची भाषा बोलतायत. त्या भाषेला सुवर्णालंकाराची पदवी त्याच तथाकथीत बाजारबुजग्या पत्रकारांनी दिली हे सत्य नाकारता येणार नाही. स्वातंत्र्यपूर्व काळातली पत्रकारिता, स्वातंत्र्य लढ्यातली पत्रकारिता अन् स्वातंत्र्यानंतरची ऐंशी-नव्वदच्या दशकापर्यंतची पत्रकारिता ही स्वतंत्र, वैचारिक, न्याय आणि सत्यवादी पहायला मिळायची. हो, त्या पत्रकारितेत एक भूमिका असायची आणि त्या भूमिकेमागचे कारणही तेवढेच हितवादी असायचे. आता त्या भूमिका बासनात गुंडाळल्या अन् वैचारिकतेपेक्षा पाकिटाला महत्व प्राप्त झाले. तिथेच पत्रकारांची दशा आणि दिशा पुढार्याच्या दारात पत्रकारिता भिकारी अशी झाल्याचा समज नेत्यांना येऊ लागला. परंतु सत्य हे सुर्यप्रकाशाइतके जाज्वल्य असते, आणि पत्रकार हा शेवटी पत्रकारच राहतो. काहींनी मान-सन्मान आणि आत्मा विकला असेल परंतु आजही सत्यासाठी-न्यायासाठी आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारा जसा सर्वसामान्य माणूस तसा पत्रकारही आहे. परंतु तसा
आत्मसन्मानाचा नेता
इथं उरलाय का? गेल्या दहा वर्षांच्या कालखंडात देशामध्ये ज्या पद्धतीने स्वाभिमान आणि निष्ठेचा लिलाव होतोय, बोली बोलली जाते, पन्नास खोके एकदम ओकेचे नारे दिले जातात, अनेक पक्ष फुटले जातायत, एका पक्षातून दुसर्या पक्षात जाण्यासाठी आमदार-खासदारांना काही वाटत नाही. ज्या विचारावर लोकांनी निवडून दिलं, त्या विचारांवर सरार्सपणे बलात्कार, खून करून विकासाचं लेकरू जन्माला घालण्याहेतू विचारासोबत शय्यासोबत केल्याचे हेच नेते दाखवतात अन् उथळ माथ्याने त्यांनी केलेल्या दलबदलूचे गोडवे गातात. महाराष्ट्रासारख्या वैचारिक राज्यात पहिल्या अडीच वर्षात तीन मुख्यमंत्र्यांनी शपथ घ्यावी, यापेक्षा दुर्दैव ते काय? विधानसभा निवडणुकीमध्ये विचाराला भारावून ज्या लोकांनी मतदान केले त्या विचारांचे आणि भूमिकांचे लक्तरे याच नेत्यांनी वेशीला टांगले. जेव्हा नेतृत्व लाचारी स्वीकारतो, विकासाच्या नावाखाली स्वहित जपतं, तेव्हा तिथे साधू-संतांचा नव्हेतर
गुंडांचा जन्म
होतो. तेच महाराष्ट्राच्या मातीसह देशातल्या काना-कोपर्यात होताना दिसतं. इथं शिक्षण, रोजगार, आरोग्य अथवा लोकांना आवश्यक असणार्या गोष्टींवर चर्चा होत नाही, इथं कुठला पक्ष फोडणार, कुठले आमदार कुठल्या पक्षात जाणार, कुठले खासदार कुठे जाणार ? यावर सातत्याने चर्चा होते. यात पत्रकारांनी आवाज उठवला तर त्यांचा आवाज त्यांच्या मालकाच्या कंठातून दाबला जातोय. नसता हातपाय तोडण्याच्या भूमिकेतून तो आवाज पांगळा केला जातो. संजय दिना पाटील सारखे खासदार थेट पोलिसांसमोर सांगतोय, आता आले तर मारणार, थेट कमिश्नरला तक्रार करा, असं म्हणत असतील तर किती हा माज, किती ही गुर्मी, हे सर्व येतं कुठून? गेल्या दहा वर्षांपूर्वीचा इतिहास आणि आजचा आर्थिक आलेख एवढ्यावर जरी पत्रकारांनी काम केलं तरी संजय दिना पाटलांना पळताभुई थोडी होईल. परंतु सत्य आम्हा म्हणी हे मानणे सर्वप्रथम गरजेचे आहे. ते पत्रकारांनी आधी मानले पाहिजे आणि मग शब्दांची रत्नजडीत माळ करायची की, शब्दांचे शस्त्र करायचे ठरवता येते. आज खासदार, आमदार ज्या गुंडगिरीच्या, माफियागिरीच्या भाषेत बोलतायत ती भाषा सत्तेसाठी एखाद्या पुढारी, कार्यकर्त्यांना केलेली नव्हती तर पत्रकारांना केलेली होती. पत्रकारांनी राज्यभरातून जेव्हा भूमिका घेतली तेव्हा संजय पाटलांनी दिलगिरी व्यक्त केली, मात्र त्या दिलगिरीतला स्वर पश्चातापाचा नव्हता तर आलेलं बालंट दूर करण्याचा होता. आज सत्ता आहे, पैसा आहे इथपर्यंत ठिक. सत्तेच्या विरोधात जेव्हा सत्य उभे ठाकेल तेव्हा अशा खासदारांना आणि त्यांना आसरा देणार्यांना पळताभुई थोडी होईल हेही तेवढेच खरे!








