बीड (रिपोर्टर) येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी खरेदीची लगबग सुरू आहे. यंदा वाढलेल्या किमतीमुळे महागाईच्या झळा गणेश भक्तांना सोसाव्या लागत आहेत. गणेश मुर्तींपासून ते सर्व पुजा साहित्य आणि प्रसाद देखील महागात मिळणार आहे. 25 टक्क्याने महागाई वाढल्याने गणेशोत्सवात महागाईचे विघ्न भक्तांच्या समोर उभे ठाकले आहे.
यावर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट नसले तरी नागरिकांना महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. गेल्या वर्षी कोरोनामुळे अगदी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. यावर्षी उत्साहात गणरायाचे आगमन होणार आहे. येत्या काही दिवसांवर गणेशोत्सव असल्याने याची तयारी जोरात सुरू आहे. परंतु यंदा गणपती मुर्तीपासून ते प्रसाद, सजावट व पुजेच्या साहित्याच्या किमतीत वाढ झाली आहे. मुर्तीमध्ये 20 ते 25 यक्क्याने वाढ झाली आहे. यातच प्रसादामध्ये प्रति किलो 20 ते 30 रुपयांनी वाढ झाली. सजावटीच्या साहित्याच्या किमतीत दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली. गेल्या वर्षी अडीच फुटाची मुर्ती अडीच ते तीन हजारापर्यंत विक्री व्हावायची आता त्याच मुर्तीची किंमत साडेतीन ते चार हजारापर्यंत गेली आहे. दोनशे ते अडीचशे रुपयांपर्यंत विक्री होणार्या गणेश मुर्ती यंदा तीनशे ते पाचशे रुपयांपर्यंत मिळत आहे. पुजा साहित्याच्या दरात देखील वाढ झाली. मागील वर्षी चारशे रुपयांना विकला जाणार्या पुजेच्या साहित्याचा संच यावर्षी सहाशे रुपयांना विकला जात आहे. प्रसादाच्या किमतीमध्ये देखील किलोमागे 20 ते 30 रुपयांनी वाढ झाली. एकूणच सर्वच बाबतीत वाढ झाल्याने गणेश भक्तांसमोर महागाईचं विघ्न समोर ठाकलं आहे.










