बीड(रिपोर्टर): गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांविरोधात बीड पोलीसांनी 24 व 25 ऑगस्ट रोजी विशेष मोहीम राबवली. यात सात वाँटेड आरोपींच्या मुसक्या आवळल्या तर अवैध दारुविक्रेते, मटकाबहाद्दरांवर 13 ठिकाणी छापे टाकून धरपकड केली. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले.
गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा, यासाठी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी अवैध धंद्यांविरोधात कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, उपनिरीक्षक भगतसिंग दुल्लत व संजय तुपे यांच्या नेतृत्वाखाली पथके गठीत केली. 24 व 25 ऑगस्ट रोजी अवैध दारुविरोधात आठ, ऑनलाइन चक्री जुगार, सोरट जुगारावर प्रत्येकी एक व कल्याण मटका जुगारावर तीन अशा एकूण 13 कारवाया केल्या. यात लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करुन 20 जणांना पकडले.चार वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणार्या पेठ बीड हद्दीतील सहा व शिरुर ठाणे हद्दीतील एक अशा सात वाँटेड आरोपींना अटक केली. त्यांना संबंधित पोलीस ठाण्यांच्या स्वाधीन केले.