मुंबई (रिपोर्टर) एकेकाळी राज्यातील मुख्यमंत्रीपदाच्या प्रमुख दावेदारांमध्ये गणना होणार्या पंकजा मुंडे यांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. मला सध्या अजिबात मुख्यमंत्री व्हायची इच्छा नाही, असे त्यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. पंकजा मुंडे या रविवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ’लोकमत टॉक’ या कार्यक्रमात बोलत होत्या.
तेव्हा पंकज यांना तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पंकजा मुंडे यांनी म्हटले की, अजिबात नाही. सध्या जे चालू आहे ते पाहता मी आहे तिथेच बरी आहे, असे पंकजा यांनी म्हटले. यापूर्वी पंकजा मुंडे यांचे, ’मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे’, हे वक्तव्य चांगलेच गाजले होते. त्यानंतर भाजपमधील राजकीय समीकरणे वेगाने बदलली होती. मात्र, यावेळी पंकजा मुंडे यांनी विधानपरिषद निवडणुकीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा सूर सकारात्मक दिसत आहे. पंकजा मुंडे आमच्या मोठ्या नेत्या आहेत. आमच्याकडून त्यांच्या नावाला पूर्ण पाठिंबा आहे. अशा काही निवडणुका होतात, तेव्हा त्यांचं नाव चर्चेत येतं. ते साहजिकच आहे. त्यांचं नाव चर्चेत येणं यात काहीच वावगं नाही. त्या कोणत्याही पदासाठी पात्र आहेत. आमच्या त्यांच्या नावाला पाठिंबा आहे. आम्ही पूर्णपणे सकारात्मक आहोत. याबद्दलचा निर्णय आमचे हायकमांड घेतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.