पडताळणीनंतर दोषींवर 420 चा गुन्हा दाखल होणार
बीड (रिपोर्टर) : शिक्षकांच्या अपंग प्रमाणपत्रात काळंबेरं असल्याचा संशय आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी तब्बल 336 शिक्षकांच्या प्रमाणपत्राच्या पडताळणीला आज सुरुवात केली असून ही पडताळणी सात पथकांमार्फत केली जात आहे. त्यामध्ये एक वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. त्यामुळे बोगस प्रमाणपत्र काढणार्या शिक्षकांच्या तंबूत घबराटीचे वातावरण पहावयास मिळत आहे. सदरील प्रमाणपत्रांची पडताळणी पुन्हा एकदा अंबाजोगाईच्या मेडिकल कॉलेजसह मुंबई येथील मेडिकल बोर्डाकडून करण्यात येणार आहे. दोषी गुरुजींवर 420 चा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याने बोगसगिरी करणार्या शिक्षकात धांदल उडाली आहे. सदरच्या प्रमाणपत्रांची पडताळणी सध्या सुरू झाली असून सायंकाळपर्यंत कुठल्या शिक्षकाने बोगस प्रमाणपत्र जोडण्याचा प्रयास केला हे उघड होण्याची शक्यता आहे.
शिक्षकांच्या बदली प्रक्रियेमध्ये ऑनलाईन अर्जाद्वारे माहिती भरून घेण्यात आली. यामध्ये जिल्हा परिषदेचे प्राथमिक आणि माध्यमिक अशा जवळपास 336 शिक्षकांनी आपण स्वत: किंवा आपली पत्नी किवा पती अपंग आहेत, ते आपल्यावर अवलंबून असल्यामुळे आपण ज्या ठिकाणी नोकरी करतोत अशा ठिकाणावरून बदली करण्यात येऊ नये, अशी माहिती या बदली प्रक्रियेच्या अर्जामध्ये नमूद केली. असे सर्व 336 शिक्षक हे बनावट असल्याची शंका जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार आणी त्यांच्या टिमला आली. त्यानुसार त्यांनी नियोजन करून आज जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये या 336 शिक्षकांच्या अपंग प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यासाठी सात पथकांची नियुक्ती केली. हे पथक उपशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या नेतृत्वात नेमले गेले. त्यामध्ये उपशिक्षणाधिकारी अजय बहीर, शिक्षण विभागाचे अधिक्षक राजेश खटावकर, उपशिक्षणाधिकारी तुकाराम पवार, उपशिक्षणाधिकारी नानाभाऊ हजारेंसह शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी यांच्या नेतृत्वात हे पथक नेमले. या पथकासोबत जिल्हा रुग्णालयातील एका वैद्यकीय अधिकार्याची नियुक्ती करण्यात आली. त्यामध्ये डॉ. कट्टे, डॉ. लोढा, डॉ. जाधव आदी वैद्यकीय अधिकार्यांचा समावेश होता. अपंगाच्या प्रमाणपत्रामध्ये जास्तीत जास्त अपंगांचे कर्णबधीर अपंग प्रमाणपत्र आढळून येत आहेत. सध्या जिल्हा परिेदेच्या सभागृहामध्ये या शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी होत आहे. जे प्रमाणपत्र धारक शिक्षक व त्यांचे नातेवाईक बोगस आढळून येतील त्या प्रमाणपत्रांची पुन्हा फेर पडताळणी अंबाजोगाई आणि मुंबईतील मेडिकल बोर्डाकडून करण्यात येणार आहे. मेडिकल बोर्डाच्या पडताळणीतही जे दोषी शिक्षक आढळून येतील त्यांचे मूळ वेतन सोडता इतर वेतन आणि लाभ भत्ते कपात करण्यात येऊन त्यांच्यावर 420 नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. इतर कारवाई राज्य शासनाचे मार्गदर्शन घेऊन करण्यात येईल, असे जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले.