कारखाना नाही किमान रसवंती तरी सुरु करा आ.पवारांना टोला
गेवराई (रिपोर्टर) शहरातील शासकीय जागांवर अतिक्रमण करून काढलेल्या व्यापारी गाळ्यातून भाडं खाणार्यांसाठी कारखाना, संस्था, सुतगिरणी या त्यांच्या अकलेच्या पुढच्या गोष्टी आहेत. एका कारखान्याचं उद्घाटन तुम्ही आणि तुमच्या नेत्यांनी करून शेतकर्यांच्या जमीनी लाटल्या अगोदर त्याचा हिशोब द्या. आम्ही तुम्हाला सुतगिरणी दिली होती, केवळ आपल्या अय्याशीमुळे त्याचे वाटोळे झाले, त्यामुळे आम्हाला बोलण्याची वेळ आणू नका लवकरच नगर परिषदेचा कच्चा चिठ्ठा जनतेसमोर आणून तुमचा खरा चेहरा लोकांना दाखविल्याशिवाय राहणार नाही असे सांगताना शासकीय जमीनीवरील भाडं खाण्या इतपत कारखाना काढणं सोपं नसतं, किमान एखादी रसवंती तरी सुरु करून दाखवा असा टोला विजयसिंह पंडित यांनी आ.पवार यांचे नाव न घेता लगावला.
गेवराई शहरातील दिसेल त्या जागेवर आपल्या बापजाद्याची इस्टेट आहे असे लोकांना दाखवून अतिक्रमण केले, शासनाच्या जागेबरोबरच जिल्हा परिषदेच्या जागेवर सुध्दा गाळे काढून त्याचं भाडं खाण्याचा उद्योग ही मंडळी करत आहेत. बापजाद्यांनी दान दिलेल्या जागा सुध्दा यांना पुरेनात आणि ते लोक आम्हाला काय अक्कल शिकविणार. ‘नाचता येईना अंगण वाकडे’ या म्हणीप्रमाणे नविन कारखाना काढण्यासाठी अडचणींची यादी लोकांना सांगत आहात, या तालुक्यात आजही 10-12 कारखान्यांचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत. तुम्ही आणि तुमच्या नेत्यांनी गवगवा करून उद्घाटन केलेल्या कारखान्याचे काय झाले ? हे सुध्दा लोकांना सांगा. स्वतःचा कारखाना नसताना आपल्या कार्यालयातून परजिल्ह्यात पाठविलेल्या ऊसात दलाली खाणार्यांनी शेतकर्यांचा पुळका दाखवू नये. अगोदर तुम्ही पाठविलेल्या ऊसाचे पैसे कष्टाने ऊस जगविलेल्या शेतकर्यांना द्या आणि मग जय भवानीकडे बोट दाखवा. दलालांना जय भवानी बद्दल बोलण्याचा अधिकार नाही असा टोला बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी लगावला. आ.लक्ष्मण पवारांच्या प्रसिध्दी पत्रकाला उत्तर देताना ते बोलत होते.
पुढे बोलताना विजयसिंह पंडित म्हणाले की, जय भवानी सुरु होवू नये म्हणून यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी टोकाचे प्रयत्न केले, सर्व शक्ति पणाला लावली पण भवानीच्या कृपेने आणि शेतकर्यांच्या आशिर्वादाने जय भवानीने उच्चांकी गाळप केले. आज यांच्या मनात ती सल असून त्यामुळेच अशी गरळ विरोधक ओकत आहेत. कारखान्याचा ‘क’ बाबतची टिका भलतीच जिव्हारी लागलेली दिसते परंतु या टिकेला उत्तर देण्यासाठी या वकिल असलेल्या माणसाला दोन दिवस लागले, मुळात वेळेवर झोप होत नसल्यामुळे अशा अडचणी निर्माण होत आहेत असाही खोचक टोला विजयसिंह पंडित यांनी लगावला.
शेवटी बोलताना विजयसिंह पंडित म्हणाले, गेवराई नगर परिषदेतील भ्रष्टाचार आणि कोट्यावधी रुपयांचा अपहार लोकांसमोर आला आहे, पुराव्यानिशी तक्रारी केल्या आहेत, भ्रष्टाचाराच्या संदर्भात कारवाई होवू नये म्हणून नेत्यांकडे लोटांगण घालण्याची नामुष्की तथाकथीत कार्यसम्राटांवर आली. ज्यांना जय भवानी शाप वाटत असेल तर त्यांनी खुशाल नविन कारखाना उभा करावा आणि ती कुवत नसेल तर किमान रसवंती तरी उभी करावी असे आवाहन विजयसिंह पंडित यांनी केले.