बीड (रिपोर्टर) विद्यापीठाच्या शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी आजपासून संप पुकारला असून त्यांनी जे महाविद्यालय अकरावी/बारावी अटॅच आहेत, अशा महाविद्यालयातील इयत्ता बारावीच्या परीक्षा काम-काजावरही बहिष्कार टाकल्याने कामकाज खोळंबलेले आहेत.
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी राज्य सरकारच्या शिक्षण विभागाला काही मागण्या मान्य करा नसता आम्ही संप करणार, अशी नोटीस दिली होती मात्र या बाबत राज्य सरकार आणि शिक्षण विभागाने गांभीर्य न घेतल्याने या संपाला आजपासून सुरुवात झालेली आहे. शिक्षकेत्तर कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू केलेला नाही तो लागू करावा, भविष्य निर्वाह निधीतील फरकाची रक्कम तात्काळ देण्यात यावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी, (पान 7 वर)
यासह इतर मागण्यांसाठी हा संप या कर्मचार्यांनी पुकारलेला आहे. मध्यंतरी दोन वेळेस राज्य सरकारने या कर्मचार्यांसोबत बोलण्याचे आश्वासन दिले होते मात्र राज्य सरकारने तोडगा न काढल्याने शेवटी या संपाला आजपासून सुरुवात झाली आहे. विद्यापीठातील कर्मचारी सर्व कामकाजावर बहिष्कार टाकून प्रांगणात धरणे आंदोलन सुरू केले आहे तर महाविद्यालयातील कर्मचार्यांनी महाविद्यालये आवारात धरणे सुरू केले आहेत. या संपामुळे इयत्ता बारावीच्या आजपासून सुरू झालेल्या परीक्षेच्या कामकाजावर परिणाम झाला आहे.