बीड (रिपोर्टर) देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापूरमधील जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांचे हे वक्तव्य कायदा व सुव्यवस्था बिघडवणारे असून त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे केली आहे. निवडणूक विभागाच्या विरोधातही कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. या वेळी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची कोल्हापूर येथे 19 फेब्रुवारी रोजी जाहीर सभा झाली. या सभेत शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीने जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे करण्यात आली. तर निवडणूक विभागाच्या निषेधार्थही शिवसेना कार्यालयासमोर शिवसैनिकांनी तीव्र निदर्शने केली. निवडणूक विभागाने दिलेला निकाल चुकीचा असल्याचे शिवसैनिकांनी म्हटले असून निवडणूक विभागाचा जाहीर निषेध करण्यात आला. या वेळी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, अप्पासाहेब जाधव, सुनील सुरवसे, शेख निजाम, पिंगळे, सिंगण, यांच्यासह आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती.