बीड (रिपोर्टर) जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या समोरील रहेमतनगर भागात एकाने नवीन बांधकाम करण्यासाठी खोदकाम केले होते. या खोदकामामुळे बाजुची तीन मजली इमारत सकाळी कलली. या घटनेची माहिती नगरपालिका, पोलीस प्रशासनाला झाल्यानंतर त्याठिकाणी कर्मचारी डेरेदाखल झाले. दुपारी सव्वाबाराच्या दरम्यान इमारत पुर्णत: जमीनदोस्त झाली. या प्रकरणात दोषी कोण आहे? याबाबत प्रशासकीय पातळीवर चौकशी केली जात आहे.
शेख जमाल यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यायासमोरील रहेमतनगर येथे बांधकाम केले. त्यांची तीन मजली इमारत पुर्ण बांधून झाली असून या इमारतीच्या बाजुलाच शेख हारुण यांचा प्लॉट असल्याने त्यांनी बांधकाम करण्यासाठी खोदकाम केले. तळघर बांधकामासाठी त्यांनी खोदकाम करून कामाला सुरुवात केली होती. आज सकाळी शेख जमाल यांची इमारत कलल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती बीड नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाला झाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बाजुच्या इमारतीतील लोकांना घराच्या बाहेर जाण्याचे निर्देशित करत बाजुचे घरं रिकामे केले. दुपारी सव्वा दोन वाजता ही इमारत पुर्णत: जमीनदोस्त झाली. या प्रकरणी प्रशासकीय पातळीवर चौकशी सुरू आहे. इमारत पडल्याने शहरात एकच खळबळ उडाली असून बांधकाम करताना कुठली काळजी घेतली जावी याबाबत नगरपालिकेचे निर्देश मानले जातात की नाही? किंवा नगरपालिका नवीन बांधकाम करणार्यांना कशा पद्धतीच्या सूचना देतात किंवा देत नाहीत याचीही चर्चा होत आहे. अनेकांचे बांधकाम विनापरवाना असते, काहींचे बांधकाम जास्तीचे करून नियम धाब्यावर बसवले जातात.
दोषींवर गुन्हा दाखल करणार -सीओ
सदर पडलेल्या इमारतीला बांधकाम परवाना देताना तांत्रिक बाबीची तपासणी केली जाईल, तांत्रिक बाबीमध्ये दुर्लक्ष करताना दोषी आढळून आलेले नगर-पालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि या इमारतीचा बांधकाम आणि प्लॅन करणारे खासगी इंजिनिअर हे दोषी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे रिपोर्टरला बोलताना बीड नरपालिकेचे नवनियुक्त सीओ उमेश ढाकणे यांनी सांगितले.