आष्टी (रिपोर्टर):- आष्टी तालुक्यात झालेल्या गारपीटीने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हे नाकारणे चुकीचे. शेतकर्यांच्या पाठिशी प्रशासन उभे असून शेतकर्यांच्या शेतातील पिकांचे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना तलाठ्यांसह मंडल अधिकार्यांना देण्यात आल्या असल्याचे सांगून शेतकर्यांना नुकसानीची मदत मिळेल, असे आश्वासित करत कृषी आयुक्त सुनिल चव्हाण यांनी आष्टी तालुक्यातील शेतकर्यांच्या थेट बांधावर जावून नुकसानीची पाहणी केली.
शनिवारी सायंकाळी तालुक्यातील दौलावडगांव महसुल मंडळासह 10 ते 12 गावात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. शेतकर्यांचे कांदा, द्राक्ष, गहू आणि डाळिंब यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा आणि द्राक्षे या पिकांना लाखो रुपये खर्च करून विक्री तर कुठे काढणीला आलेले पीक भुईसपाट झाले आहे. याच पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषी आयुक्त सुनिल चव्हाण स्वतः आष्टी तालुक्याच्या दौर्यावर आले आहे. नुकसान ग्रस्त परिसरात कृषी आयुक्त स्वतः शेतकर्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेती पिकाचे नुकसान झाले आहे.लवकरच शेतकर्यांना मदत मिळेल तलाठी मंडळ अधिकारी तात्काळ पंचनामा करतील अशा स्वरूपाची माहिती देण्यात आली आहे.
आष्टी तालुक्यातील अरणविहिरा, तागडखेल, वेलतुरी, देवळाली, घाटापिप्री, गहुखेल, कारखेल, म्हसोबाची वाडी, चिंचेवाडी सह 10 ते 12 गावात ठिकठिकाणीही शनिवारी दि.15 एप्रिल रोजी गारा पडल्या मोठ्या प्रमाणावर शेतकर्यांचे नुकसान झाले महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त सुनिल चव्हाण हे स्वतः आष्टीच्या विविध भागात जाऊन पाहणी केली शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान पाहून मदत बाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.झालेल्या अवकाळीने शेतकरी अश्रु ढाळत आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान बघता मदतीची मागणी करत असतांना आता कृषी आयुक्त पाहणी करून झाल्यावर काय निर्णय घेतात हे बघणं महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला काय मदत होते याकडे शेतकर्यांचे लक्ष लागून आहे.यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर, तहसिलदार विनोद गुंडमवार, तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, बीड तालुका कृषी अधिकारी,आत्माचे राजेंद्र धोंडे, यांच्या सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.